पाचट जाळू नका; पाणी वाचवा, उसाचे उत्पादन वाढवा!

पाचट आच्छादनामुळे ५० टक्क्यांपर्यंत पाणी बचत शक्य
कोल्हापूर : दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, मजुरांची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांसाठी पाचट आच्छादन फायदेशीर ठरू शकते. उसाच्या शेतात पाचट ठेवल्याने पाण्याची सुमारे ५० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. तसेच पाचट जाळल्यामुळे होणारे प्रदूषण टाळून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यास मदत होते.
जिल्ह्यात ऊसतोडणीचा हंगाम लवकरच सुरू होत असून, उसाखालील क्षेत्र सुमारे दोन लाख हेक्टर आहे. त्यापैकी दरवर्षी सुमारे ५० टक्के, म्हणजेच एक लाख हेक्टर क्षेत्रावर खोडवा घेतला जातो. वाढत्या यांत्रिकीकरणामुळे हार्वेस्टरने ऊसतोडणी झाल्यानंतर पाचटाचे शेतातच बारीक तुकडे होतात. त्यामुळे सुमारे ३५ ते ४० हजार हेक्टर क्षेत्रावर पाचट आच्छादन होऊन त्याचा मोठा फायदा मिळण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.जिल्ह्यात २००९ मध्ये राधानगरी तालुक्यातून ‘पाचट अभियान’ सुरू झाले. या उपक्रमाला शासनानेही पाठबळ दिले. गतवर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी साखर कारखाने आणि कृषी विभागाला पाचट व्यवस्थापनाबाबत विशेष सूचना दिल्या होत्या.
ऊस हे अधिक पाणी लागणारे पीक आहे. सुरू उसासाठी हेक्टरी सुमारे तीन कोटी लिटर, पूर्वहंगामी उसासाठी साडेतीन कोटी लिटर, तर आडसाली उसासाठी सुमारे चार कोटी लिटर पाणी लागते. पाचट आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकतो आणि बाष्पीभवन कमी होते. परिणामी, पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर वाढवून पाणी बचत करणे शक्य होते.
पाचट व्यवस्थापनाचे प्रमुख फायदेखर्चात बचत :
भांगलण व मशागतीच्या खर्चात सुमारे ५० टक्के बचत होऊ शकते.पाण्याची बचत : जमिनीतील ओलावा टिकून राहिल्याने सिंचनाची गरज कमी होते.सेंद्रिय खताची निर्मिती : एका एकरातून मिळणाऱ्या चार ते पाच टन पाचटापासून दोन ते तीन टन सेंद्रिय खत तयार होते.
अन्नद्रव्यांचा पुरवठा :
पाचट कुजल्यानंतर जमिनीला प्रतिहेक्टरी ४० ते ५० किलो नत्र, २० ते ३० किलो स्फुरद आणि ७५ ते १०० किलो पालाश मिळते.
उत्पादनवाढ :
उसाच्या उत्पादनात एकरी चार ते सहा टन वाढ होऊ शकते.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पाचट जाळू नये, त्याचे शेतातच आच्छादन करावे आणि खोडवा व निडवा पीक घेण्यावर भर द्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.





