ऊसदराची कोंडी कायम; दोन दिवसांत कारखानदारांची स्वतंत्र बैठक

कोल्हापूर : ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी येत्या दोन दिवसांत साखर कारखानदारांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीला कारखानदार वेळेत उपस्थित न राहिल्याने शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले. गोंधळामुळे बैठक निष्फळ ठरली असून, ऊसदराची कोंडी कायम आहे.
पालकमंत्री आबिटकर यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटना आणि साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. दुपारी अडीच वाजता होणाऱ्या या बैठकीला कारखानदार वेळेत न आल्याने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. तोडणी-वाहतूक संघटनेच्या प्रतिनिधींच्या वक्तव्यानेही वादाला तोंड फुटले.
बैठकीत शेतकरी संघटनांनी ऊस उत्पादनाचा खर्च आणि साखर कारखान्यांना होणाऱ्या नफ्याचा मुद्दा मांडला. बियाणे, रासायनिक खते आणि मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटक व तमिळनाडूतील साखर कारखानदारी आणि ऊसदराची माहितीही यावेळी देण्यात आली.
साखर कारखानदारांची बाजू मांडताना आमदार चंद्रदीप नरके यांनी प्रत्येक कारखान्याची रिकव्हरी वेगवेगळी असून, कर्मचाऱ्यांच्या वेतनातही फरक असतो, असे सांगितले. साखरेचे दर सध्या वाढले असले तरी ते कायम टिकून राहतील याची शाश्वती नसल्याचे त्यांनी नमूद केले. उसाला योग्य भाव देतानाच साखर उद्योगही टिकून राहावा, यासाठी समन्वयातून मार्ग काढण्याची भूमिका त्यांनी मांडली.
ऊसदराचा तोडगा निघेपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही : राजू शेट्टी
साखरेची किमान विक्री किंमत प्रतिकिलो ५० रुपये झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. कारखानदारांनी चर्चा करून ऊसदर जाहीर करावा. दराचा तोडगा निघेपर्यंत एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीला आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलिस अधीक्षक डॉ. निलोत्पल यांच्यासह अधिकारी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि काही साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.






