उसाच्या शेतात सापडला कोटींचा गांजा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अक्कलकोटमध्ये गांजाची २४० झाडे जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अक्कलकोट : तालुक्यातील आळगी गावातील उसाच्या शेतात लावलेला सुमारे एक कोटी पाच लाख रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला. अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शेतकऱ्यासह त्याच्या दोन मुलांना अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मल्लप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार , त्याची मुले सिद्धराम बिराजदार आणि श्रीकांत बिराजदार तिघे रा. शेगाव, ता. अक्कलकोट) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

बारा फुटांपर्यंत वाढलेली झाडे आढळली

मल्लप्पा याच्या आळगी गावच्या हद्दीतील शेतात गांजाची लागवड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने २२ ते २५ कर्मचाऱ्यांसह शेतावर छापा टाकला. तपासणीदरम्यान उसामध्ये लावलेली सुमारे १२ फूट उंचीची गांजाची २४० झाडे आढळली. त्यामध्ये २१० जिवंत, तर ३० वाळलेल्या झाडांचा समावेश होता.

पोलिसांनी गांजा जप्त करून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेतात काम करणारे दोन तणनाशक फवारणी कामगार फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मजुरांकडून बिया पडल्याचा दावा

चौकशीदरम्यान मल्लप्पा याने, मागील वर्षी ऊसतोडणीसाठी आलेल्या काही कामगारांकडील बिया पडल्याने गांजाची झाडे उगवली असावीत आणि त्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचा दावा केला. मात्र, आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक गांजा लावण्यात आल्याचे त्याने नंतर सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »