सहकारी संस्थांना दीड लाख कोटींच्या कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट : हर्षवर्धन पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून (एनसीडीसी) चालू वर्षात देशातील सहकारी संस्थांना दीड लाख कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील पाच वर्षांत हे उद्दिष्ट चार लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा संकल्प असल्याची माहिती एनसीडीसीचे संचालक हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

एनसीडीसीच्या महापरिषदेची बैठक नवी दिल्ली येथे गुरुवारी (दि. २९) केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी आगामी २५ वर्षांचा कृती आराखडा पुढील दोन महिन्यांत तयार करण्याचे आदेश शाह यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी एनसीडीसी कटिबद्ध असून, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संस्थेचे जाळे निर्माण झाले आहे. याचा फायदा साखर व सहकारी प्रक्रिया उद्योग, शेती, दुग्ध व्यवसाय, भारत टॅक्सी, मत्स्यव्यवसाय तसेच महिला आणि युवकांना होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील साखर उद्योगाला चार हजार कोटींचे कर्ज

एनसीडीसीने गेल्या दोन वर्षांत देशातील साखर उद्योगाला ४० हजार कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केला. त्यापैकी महाराष्ट्राला चार हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »