दिलीप पाटील यांची ‘शुगरटुडे’च्या सल्लागार मंडळावर निवड

पुणे । शुगरटुडे वृत्त
इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीचे (IFGE) पश्चिम विभाग संचालक आणि साखर उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे सक्रिय व्यक्तिमत्त्व श्री. दिलीप पाटील यांची ‘शुगरटुडे’च्या सल्लागार मंडळावर निवड करण्यात आली आहे. साखर व पूरक उद्योग, तसेच सहकार क्षेत्रासाठी समर्पित ‘शुगरटुडे’ हे गेल्या पाच वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल स्वरूपात प्रसिद्ध हाेणारे आणि या क्षेत्राला समर्पित असे एकमेव मराठी प्रकाशन आहे.
सध्या या सल्लागार मंडळामध्ये ख्यातनाम कृषिशास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक (प्रमुख मार्गदर्शक), श्री. शेखर गायकवाड (माजी साखर आयुक्त), डॉ. याेगेंद्र नेरकर (माजी कुलगुरू), डॉ. सुरेश पवार (प्रसिद्ध ऊसतज्ज्ञ), डॉ. बाळकृष्ण जमदग्नी (प्रसिद्ध ऊसतज्ज्ञ), एस. बी. भड (प्रसिद्ध उद्योगपती) या अनुभवी नामवंतांचा समावेश आहे.

श्री. दिलीप पाटील यांनी या सल्लागार मंडळामध्ये यावे, असे विनंती करणारे पत्र ‘शुगरटुडे’चे मुख्य संपादक श्री. नंदकुमार सुतार यांनी नुकतेच दिले आणि श्री. पाटील यांनी लागलीच त्यास होकार दिला. त्याबद्दल श्री. सुतार यांनी श्री. पाटील यांचे आभार व्यक्त केले. श्री. पाटील यांच्यामुळे ‘शुगरटुडे’ला अधिक वाचकाभिमुख करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
श्री. दिलीप पाटील ‘शुगरटुडे’चे नियमित लेखक आहेतच. ते सल्लागार मंडळामध्ये आल्याने ‘शुगरटुडे’च्या मजकुरात अधिक वैविध्य आणता येणार आहे.
श्री. पाटील हे साखर आणि हरित ऊर्जा क्षेत्रात गेल्या चार दशकांपासून कार्यरत आहेत. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर, ते या क्षेत्रामध्ये अधिक सक्रिय झाले आहेत. शासनाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे. दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असो. (इंडिया) अर्थात डीएसटीएच्या कौन्सिलमध्येही ते सध्या कार्यरत आहेत. त्यांनी ब्राझील, जर्मनी सारख्या साखर आणि हरित ऊर्जा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या देशांचे अभ्यास दौरे केले आहेत. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप शुभेच्छा!
श्री. सुतार हे गेल्या ३५ वर्षांपासून पत्रकारितेमध्ये आहेत. ‘शुगरटुडे’चा प्रारंभ करण्यापूर्वी त्यांनी ‘दै. सकाळ’ आणि ‘दै. पुढारी’ यांसारख्या वृत्तपत्रांच्या संपादक पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी दै. लोकमत, दै. एकमत इ. वृत्तपत्रांमध्येही विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते श्री. शरदचंद्र पवार यांच्यासह प्रमुख राजकीय नेते, उद्योजक आदींच्या मुलाखती घेतल्या आहेत.






