ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर १५ दिवसांत बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : ऊसतोड कामगारांची सुरक्षितता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी १५ दिवसांत जिल्हास्तरीय संयुक्त बैठका आयोजित कराव्यात, असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बैठकीत आवश्यक कार्यवाहीचे आदेश देऊन त्याचा अहवाल महामंडळाकडे सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका दीपा मुधोळ-मुंडे यांनी यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि आमदार नीलम गोऱ्हे यांनी १९ ऑक्टोबर रोजी समाजकल्याण आयुक्तांना पत्र पाठवून ऊसतोड कामगारांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले होते. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत महामंडळाने जिल्हास्तरावर संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील विभागांच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करावे, असे निर्देशांत नमूद करण्यात आले आहे:

आरोग्य आणि समाजकल्याण
कामगार आणि शिक्षण
महिला व बालविकास
अन्न व नागरी पुरवठा
पोलीस आणि पशुसंवर्धन

संबंधित अधिकाऱ्यांसह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि ऊसतोड कामगारांच्या प्रतिनिधींनाही बैठकीसाठी निमंत्रित करावे. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून आवश्यक कार्यवाहीचे आदेश द्यावेत आणि त्याचा अहवाल महामंडळाकडे पाठवावा, असे २९ ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »