‘शिसाका’ आता ‘माँ-रेवा शुगर्स’कडे!

शिरपूर : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना (शिसाका) अखेर पूर्ववत सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मध्य प्रदेशातील मे. माँ-रेवा शुगर्स प्रा.लि. यांनी हा कारखाना २० वर्षांच्या भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला असून, २०२६-२७च्या गळीत हंगामात कारखान्याची धुराडी पुन्हा पेटणार आहेत.
३० जानेवारी रोजी सर्व कायदेशीर तांत्रिक अडचणी दूर करून, नियमानुसार स्टॅम्प ड्युटी भरून या कराराचे अधिकृत रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे. या करारपूर्तीवेळी कारखान्याचे अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीपभाई पटेल, माँ-रेवा कंपनीचे अंकित गोयल, जनरल मॅनेजर गणेश यादव आणि इतर संचालक उपस्थित होते. यामुळे शिरपूर परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, आमदार अमरिशभाई पटेल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि जिल्हा बँकेच्या सहकार्याने हा पेच सुटला आहे. माँ-रेवा शुगर्सचे डायरेक्टर अंकित गोयल यांच्याकडे यापूर्वी ७ साखर कारखाने यशस्वीपणे चालवण्याचा दांडगा अनुभव आहे. शिरपूर हा त्यांचा ८ वा प्रकल्प असेल. कारखाना वेळेत सुरू करण्यासाठी मशिनरी आणि इतर तांत्रिक कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत.






