ऊस तोडणीसाठी गेलेल्या तरुणांना अमानुष मारहाण

बारामतीतील घटनेनंतर पीडित तरुण भयभीत
बीड : मजुरीसाठी पश्चिम महाराष्ट्रात गेलेल्या केज तालुक्यातील दोन पारधी समाजाच्या तरुणांना १० ते १२ जणांनी अज्ञात ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगावर मारहाणीचे गंभीर वळ आणि डोळ्यांत प्रचंड दहशत घेऊन हे तरुण आपल्या गावी परतले आहेत.
नेमकी घटना काय?
केज तालुक्यातील केवड येथील श्रावण महादेव काळे आणि राहुल विलास काळे हे तरुण नागझरी येथील एका मुकादमासोबत पुणे जिल्ह्यातील बारामती जवळील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी गेले होते. ३० जानेवारी रोजी त्यांना एका पिकअपमधून नेऊन सुमारे १२ लोकांनी अमानुष मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्यातून वाचत दोघेही ३१ जानेवारीला केजला पोहोचले. या गंभीर प्रकरणातील सत्य शोधून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.
दरम्यान, पीडित तरुण अशिक्षित असल्याने नातेवाइकांसह केज पोलीस ठाण्यात दाद मागण्यासाठी गेले होते. मात्र, ही घटना पुणे आणि धाराशिव जिल्ह्यांच्या हद्दीत घडल्याचे समोर येत असल्याने गुन्हा नोंदवण्याबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पीडितांचा आरोप: मुकादमानेच आम्हाला धाराशिव जिल्ह्यातील ढोकी साखर कारखाना परिसरात नेऊन रात्रीच्या वेळी बेदम मारहाण केली.
मुकादमाचा दावा: या मारहाणीशी आपला काहीही संबंध नसून, या दोघांना त्यांच्या ‘जात पंचायती’मध्ये मारहाण झाली आहे.






