नॅचरल उद्योग समूहाचे कार्य ग्रामीण विकासासाठी प्रेरणादायी; सहकार मंत्री

आवडल्यास ही बातमी शेअर करा

धाराशिव : शुगरटुडे

शेतकरीहित, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधत ग्रामीण विकासाला चालना देणारे काम ‘नॅचरल’ उद्योग समूहाने उभे केले आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत असून, हा उद्योग समूह राज्यातील सहकार क्षेत्रासाठी आदर्श ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.

रविवारी त्यांनी नॅचरल शुगर्स अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेडला भेट देऊन विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील उद्योग समूहाची वाटचाल, विस्तार, तांत्रिक प्रगती आणि शेतकरी-केंद्रित योजनांची सविस्तर माहिती दिली.

भेटीदरम्यान मंत्र्यांनी उद्योग समूहातील विविध उत्पादन प्रक्रिया, व्यवस्थापन पद्धती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याची माहिती घेतली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रिया आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले, ग्रामीण विकासासाठी उद्योगांनी केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता शेतकरी, कामगार आणि स्थानिक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योगदान देणे आवश्यक आहे. ‘नॅचरल’ उद्योग समूहाने ही भूमिका प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली असून, आधुनिक व्यवस्थापन आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा प्रभावी मेळ घातला आहे.

शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत साखर उद्योगाला नवी दिशा देणारे कार्य उद्योग समूह करत असल्याचे नमूद करून त्यांनी बी. व्ही. ठोंबरे यांचे अभिनंदन केले. उद्योग समूहाच्या भविष्यातील विस्तार योजनांसाठी शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

या प्रसंगी कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »