‘स्वाभिमानी’ची १० ऑक्टोबरला ऊस परिषदेची हाक!

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत ऊस दर, शेतकऱ्यांचे हक्क, तसेच सरकारच्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम यावर सविस्तर चर्चा होणार आहे. संघटनेचे नेते व पदाधिकारी शेतकऱ्यांना एकत्र आणून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत.
संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. १५) शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीनंतर परिषदेची अधिकृत घोषणा केली. परिषदेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहण्याची अपेक्षा असून, ऊस उद्योगाशी संबंधित विविध मुद्द्यांवर ठोस भूमिका घेण्यात येणार आहे.
शेट्टी म्हणाले, की अपरिपक्व उसामुळे चालू हंगामात साखरेच्या रिकव्हरीमध्ये १.२० ते १.५० टक्क्यांची घट होईल. महाराष्ट्रात सरासरी १० ते १२ कोटी टन उसाचे गाळप होते. रिकव्हरी घटल्यास राज्यातील एकूण साखर उत्पादन अंदाजे १२ लाख ते १८ लाख टनांनी घटू शकते. तसेच, परतीचा पाऊस न झाल्याने उत्पादनात आणखी १५ ते २० टक्के घट होऊन एकूण उत्पादन २५ लाख ते ३५ लाख टनांनी घटण्याची शक्यता आहे.
या वेळी राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, जिल्हाध्यक्ष अजित पोवार, विठ्ठल मोरे, धनाजी पाटील, जयकुमार कोले, सांगली जिल्हाध्यक्ष संजय बेले, राजाराम देसाई, सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, नितीन यादव, डॉ. बाळासाहेब पाटील, बाजीराव पाटील, राम शिंदे, प्रभू भोजे, अविनाश मगदूम, विक्रम पाटील, संदीप राजोबा, रावसाहेब अबदान, विशाल चौगुले आदी उपस्थित होते.






