शेतकरी संघटनांना विश्वासात घेऊनच साखर हंगाम : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : राज्यातील साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यापूर्वी शेतकरी संघटनांशी चर्चा करावी लागेल. त्यांच्यासमोर शासनाची भूमिका मांडल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मागील वर्षी उसाला प्रतिटन ३,४०० रुपये दर देण्यात आला होता. त्यातील उर्वरित १०० रुपये अनेक कारखान्यांकडून दिले जात आहेत. मध्यंतरी साखरेच्या दरात झालेली वाढ कृत्रिम आणि अल्पकालीन होती. अवघ्या दोन दिवसांत दर पुन्हा खाली आल्याने कारखानदारांना त्याचा विशेष फायदा झालेला नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
राज्य सरकारने साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे संकेत दिले असले, तरी ऊस दराच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटनांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे हंगाम सुरू करण्यापूर्वी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगणे आवश्यक असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
एमपीएससी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री योग्य पावले उचलतील
एमपीएससी परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याची आवश्यकता आहे. चुका करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री योग्य पावले उचलतील, असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केला.






