राष्ट्रीय साखर पुरस्कारांत महाराष्ट्राचा डंका; ७७ पैकी २१ पुरस्कार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. दोन वर्षांतील एकूण ७७ पुरस्कारांपैकी तब्बल २१ पुरस्कार पटकावत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पुरस्कारांचे वितरण २२ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.

गाळप हंगाम २०२४-२५ मधील उच्च साखर उतारा विभागात कोल्हापूरच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने प्रथम क्रमांक मिळवला. तांत्रिक कार्यक्षमतेत साताऱ्याचा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना प्रथम, सांगलीचा डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना द्वितीय, तर पुण्याचा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना तृतीय ठरला.

आर्थिक व्यवस्थापन विभागात सोलापूरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने यश मिळवले. सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार भोगावती सहकारी साखर कारखान्याला, तर सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. जीवनगौरव पुरस्कारासाठी कोल्हापूरच्या कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवड करण्यात आली.

दुसऱ्या वर्षातील पुरस्कारांमध्येही महाराष्ट्राने आपला दबदबा कायम ठेवला. विविध विभागांत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी पुरस्कार मिळवले. कार्यक्षमता, आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिक व्यवस्थापन आणि सामाजिक बांधिलकीला प्रोत्साहन देण्यासाठी महासंघाकडून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.

पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह विविध राज्यांचे मंत्री, साखर कारखान्यांचे पदाधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »