कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जीवनगौरव; पांडुरंग, कृष्णा, श्री विघ्नहर इ. कारखान्यांनी पटकावले राष्ट्रीय पुरस्कार

पुणे : शुगर टुडे
सहकारी साखर कारखानदारीत अतुलनीय योगदान देणारे ज्येष्ठ नेते सन्मानीय कल्लाप्पाण्णा आवाडे यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
देशातील साखर उद्योगात महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखान्यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. गाळप हंगाम २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांसाठी घोषित झालेल्या एकूण ५७ राष्ट्रीय पुरस्कारांपैकी तब्बल २१ पुरस्कार एकट्या महाराष्ट्रातील कारखान्यांनी मिळवले आहेत.
२२ सप्टेंबरला नवी दिल्लीत पुरस्कार वितरण सोहळा
सहकारी साखर उद्योगातील गुणवत्ता, कार्यक्षमता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक शिस्त आणि सामाजिक बांधिलकीला प्रोत्साहन देण्यासाठी महासंघाच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांचे वितरण २२ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय विविध राज्यांतील मंत्री, साखर कारखान्यांचे संचालक, पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहतील.
हंगाम २०२५-२६ : महाराष्ट्रातील पुरस्कारविजेते कारखाने
सन २०२५-२६ च्या हंगामासाठी महाराष्ट्रातील कारखान्यांनी खालील विभागांत यश संपादन केले आहे:
- तांत्रिक कार्यक्षमता (उच्च उतारा विभाग) :
- प्रथम : नीरा भीमा सहकारी साखर कारखाना (पुणे)
- द्वितीय : विलास सहकारी साखर कारखाना (तुळजापूर)
- तृतीय : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना (पुणे)
- सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना (सातारा)
- संस्थात्मक सामाजिक दायित्व (CSR) : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना (सांगली)
- सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना (सोलापूर)
- वसंतदादा पाटील पुरस्कार : डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना (सांगली)
हंगाम २०२४-२५ : महाराष्ट्राची दमदार कामगिरी
सन २०२४-२५ च्या हंगामातही राज्यातील कारखान्यांनी विविध श्रेणींमध्ये पारितोषिके पटकावली आहेत:
- उच्च उतारा विभाग :
- प्रथम : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना (कोल्हापूर)
- द्वितीय : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना (जालना)
- तृतीय : सह्याद्री सहकारी साखर कारखाना (सातारा)
- तांत्रिक कार्यक्षमता :
- प्रथम : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (सातारा)
- द्वितीय : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना (सांगली)
- तृतीय : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना (पुणे)
- आर्थिक व्यवस्थापन :
- तृतीय : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना (सोलापूर)
- सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार : भोगावती सहकारी साखर कारखाना (कोल्हापूर)
- संस्थात्मक सामाजिक दायित्व (CSR) : अशोक सहकारी साखर कारखाना (कोल्हापूर)
- सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना : श्री छत्रपती शाहू सहकारी कारखाना, कागल (कोल्हापूर)
- वसंतदादा पाटील पुरस्कार : भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (पुणे)
- जीवनगौरव पुरस्कार : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना (कोल्हापूर)






