‘शाहू’त उभारणार १२ टन क्षमतेचा बायो-सीएनजी प्रकल्प

कोल्हापूर : केंद्र सरकारचे इथेनॉल निर्मितीविषयक धोरण शेतकरी, साखर कारखानदार आणि देशाच्या हिताचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या धोरणाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. याचवेळी केंद्राच्या अनुदान योजनेचा लाभ घेऊन श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यात बायो-सीएनजी प्रकल्प उभारला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर अध्यक्षा सुहासिनिदेवी घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी समरजितसिंह घाटगे बोलत होते.
शाहू कारखान्यातर्फे दररोज १२ टन उत्पादनक्षमतेचा बायो-सीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सभासदांनीही हात उंचावून केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणाला एकमुखी पाठिंबा दर्शविला.
घाटगे म्हणाले, “इथेनॉल निर्मितीमुळे साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची एकरकमी एफआरपी देण्यास मदत झाली आहे. उद्योग क्षेत्रातील पुढील दहा वर्षांचा अंदाज विचारात घेऊन कारखान्याने नियोजन केले आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅससाठी परदेशावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जैवइंधन धोरण स्वीकारले आहे. केंद्राच्या अनुदान योजनेचा लाभ घेऊन कारखान्यात बायो-सीएनजी प्रकल्प उभारला जाणार आहे.”
सभेत सुहासिनिदेवी घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे आणि जितेंद्र चव्हाण यांची भाषणे झाली. माजी ऊर्जाराज्यमंत्री वीरकुमार पाटील, राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे, राजे वीरसिंह घाटगे यांच्यासह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.






