उसाला अंतिम दर ३,८५० रुपये देण्यासाठी कारखान्यांना निवेदन देणार

सांगली : सध्या देशभरात इथेनॉलसह साखरेला चांगला दर मिळत असल्याने दक्षिण महाराष्ट्रातील अधिक रिकव्हरी असलेल्या कारखान्यांना गुजरातच्या धर्तीवर दर देणे शक्य आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गत हंगामातील उसाला प्रतिटन ३,८५० रुपये अंतिम दर मिळावा, यासाठी सर्व कारखान्यांना लेखी निवेदन देण्याचा निर्णय शेतकरी संघटनेच्या बैठकीत झाला आहे. शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटनेच्या कार्यालयात सदर बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सहकार आघाडीचे संजय कोले म्हणाले, “गत हंगामात दिलेल्या उसाला प्रतिटन ३,८५० रुपयांप्रमाणे अंतिम दर मिळावा. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना गुजरातप्रमाणे दर मिळावा. बाळासाहेब चव्हाण म्हणाले, “इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना ऊस दर मिळण्यास मदत होत आहे.” संजय गायकवाड म्हणाले, “सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवेळी निम्म्या दराने पाणीपट्टी, घरपट्टी वसूल घेतली. त्यावेळी ऊसबिले सोयाबीन, कांदा, ज्वारी, बाजरीची विक्री न झालेल्यांना सवलतीचा फायदा घेता आला नाही.” शीतल राजोबा म्हणाले, “सांगली कृषी बाजार समितीचे विभाजन व्हायलाच हवे.”
बाळासाहेब पाटील म्हणाले, “वसंतदादा कारखान्याने २५४ कोटीचे नवे कर्ज उचलले आहे. एवढ्या पैशात दोन नवे कारखाने तयार होतात.”
रामचंद्र कणसे म्हणाले, “शक्तिपीठ’ला आमचा विरोध आहे.” वसंत कदम म्हणाले, “शेतकऱ्यांना २४ तास वीज द्यावी.” वसंत भिसे, बाशेखान मुजावर, किरण मगदूम, शंकर कापसे, बाबा पाटणे, नवनाथ पोळ, ईश्वर कणसे, सचिन गवळी, एकनाथ कापसे, किशोर मगदूम, मोहन परमणे, प्रशांत मालगावे, चारू बिरनाळे उपस्थित होते.




