ऊसशेतीला आगीचे ग्रहण; दोन लाखांचे नुकसान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अंबड : तालुक्यातील वडीगोद्री शिवारात महावितरणच्या विद्युत वाहिनीतील बिघाडामुळे उसाच्या शेताला आग लागली. या दुर्घटनेत येथील शेतकरी बापूराव दादाराव काळे व त्यांच्या भावांच्या गट क्रमांक १० मधील एकूण सात एकर ऊस क्षेत्रापैकी सुमारे दोन एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला. या आगीत अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतातून गेलेली जीर्ण विद्युत तार तुटल्याने आग लागल्याचे प्राथमिक कारण सांगण्यात येत आहे. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न केले.

आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात आली आणि उर्वरित ऊस वाचविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दोन एकरांवरील ऊस पूर्णपणे जळाला होता.

वर्षभर मेहनत, खर्च आणि कष्ट करून उभे केलेले पीक आगीत नष्ट झाल्याने शेतकरी काळे यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. महावितरणने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा, घटनेची चौकशी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच शेतशिवारातून जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांची तपासणी करून जीर्ण व धोकादायक तारांची तातडीने दुरुस्ती करावी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »