‘सोलापुरात थकीत बिलांसाठी झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन!

सोलापूर : थकीत बिल मिळण्यासाठी येथील संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकूळ साखर कारखान्याविरुद्ध सोमवारी (दि. ७) हे आंदोलन केले. थकीत असलेली उसाची बिले त्वरित मिळावीत, या प्रमुख मागणीसाठी सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. हक्काचे पैसे वसूल करण्यासाठी सोमवारी संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील पूनम गेट परिसरातील झाडावर चढून थेट ‘अर्धनग्न आंदोलन’ छेडले. प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरोधात पुकारलेल्या या तीव्र आंदोलनामुळे शासकीय यंत्रणेची मोठी धांदल उडाली.
सन २०२३-२४ आणि २०२४-२५ च्या गाळप हंगामात या तीन जिल्ह्यांतील शेकडो शेतकऱ्यांनी गोकूळ कारखान्याला ऊस पुरवला होता. मात्र, कारखान्याने शेतकऱ्यांची तब्बल अडीच कोटी रुपयांची बिले थकवली आहेत.
वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी ‘चार हुतात्मा पुतळा’ ते ‘पूनम गेट’ दरम्यान अर्धनग्न मोर्चा काढला आणि थेट झाडावर चढून घोषणाबाजी केली. कारखान्याचे चेअरमन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरली. या आंदोलनात तीनही जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाचे स्वरूप अत्यंत तीव्र आणि संवेदनशील असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनाची तीव्रता वाढल्याने दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. थकीत बिले लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांनी मंगळवारी (दि. ८) विशेष बैठकीचे आयोजन करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी झाडावरून खाली उतरत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ठिय्या आंदोलन’ कायम ठेवले.
उसाची बिले थकविल्यामुळे गोकूळ कारखान्यावर आरआरसीची कारवाई सुरू होती. मात्र, शेतकऱ्यांचे अडीच कोटी रुपये न मिळताच ही कारवाई मध्यंतरीच का थांबवली? फसवणूक करणाऱ्या चेअरमन दत्ता शिंदे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल व्हावा आणि यात निष्काळजीपणा करणाऱ्या तहसीलदारांवरही कडक कारवाई झालीच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला.





