सोमेश्वरच्या निवडणुकीला वेग; दिग्गजांसह २३ जणांचे अर्ज

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल २३ अर्ज दाखल झाले. निवडणुकीत २१ जागांसाठी लढत होणार असून ११ ऑक्टोबरला मतदान आणि १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
पहिल्या दिवशी मुरूम-वाल्हा गटातून कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, अजिंक्य सावंत, सुनील भोसले, रमाकांत गायकवाड आणि हरीश गायकवाड यांनी अर्ज दाखल केले.
तसेच गट क्रमांक १ मधून शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीशराव काकडे आणि सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभिजित काकडे या पिता-पुत्रांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवाजीराजे निंबाळकर आणि सचिन खलाटे यांच्यासह इतर इच्छुक उमेदवारांनीही अर्ज भरले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर असून, या कालावधीत आणखी अनेक उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात विविध गटांकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि कोणते उमेदवार रिंगणात राहतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.





