Latest Sugar Industry News & Cooperative Sector Updates
Latest Sugar Industry News & Cooperative Sector Updates
१६ लाखावर भारतीय वंशाच्या लोकांचा द.आफ्रिकेच्या प्रगतीसाठी हातभार
आवडल्यास ही बातमी शेअर करा
शर्करायन
मंगेश तिटकारे
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग.या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला,लोकांचे जीवनमान सुधारले.या उद्योगाचा इतिहास,आव्हाने,दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना,उद्योगाच्या अपेक्षा इ.मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे माजी एमडी,माजी साखर सहसंचालक,अभ्यासू अधिकारी आणि साखर क्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक श्री.मंगेश तिटकारे लिहिताहेत’शर्करायन’या वाचकप्रिय सदरातून.या सदरात ते लिहिताहेत,साखर उद्योगाचा मानवी स्थलांतरावरील प्रभाव…भारताच्या संदर्भाने ही मालिका असेल,ती नक्कीच सर्वांना आवडेल–
संपादक (भाग ५)
सतराव्या शतकात डच ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतल्या वसाहतींमध्ये काम करण्यासाठी पहिल्या काही भारतीयांना गुलाम म्हणून आयात केले होते.ते प्रामुख्याने बंगाल आणि दक्षिण भारतातील होते.१८२० साला मध्ये काही मळे मालकांनी मळ्यामध्ये काम करण्यासाठी हिंदुस्थानातून लोकांना आयात केले होते.१८४३ साली नाताल ब्रिटिश वसाहत बनले.हा प्रांत गरीब आणि अविकसित होता,त्यामुळे युरोपीय वसाहतवाल्यांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले.नवीन कृषी उपक्रम राबविण्यात आले.३० जानेवारी १८५२ रोजी,अनेक प्रयत्नांनंतर,एडमंड मोअरवूड आपल्या’कॉम्पेन्सेशन’नावाच्या शेतावर उसाचे उत्पादन परिपूर्ण करण्यात यशस्वी झाले.या यशोगाथेमुळे देशात अधिक युरोपीयन वसाहतकार आले.
मूळ रहिवासी असलेले झुलू जमातीचे लोक योद्धे होते,आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होते,त्यांनी गोऱ्यांसाठी काम करण्यास नकार दिला.त्यामुळे उसाच्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी मजुरांची चणचण भासू लागली.मॉरिशसमध्ये भारतीयांसोबत काम केलेले जेम्स सॉन्डर्स हे त्या मळे मालकांपैकी एक होते,ज्यांनी सरकारला शेतात काम करण्यासाठी भारतीयांना येथे आणण्याची शिफारस केली.त्यानंतर गोऱ्या मळेमालकांनी अधिकाऱ्यांकडे भारतीय मजुर उसाच्या मळ्यात काम करण्यासाठी आणण्याचे प्रयत्न केले,त्याला यश येऊन हिंदुस्थानातून उसाच्या मळ्यात काम करण्यासाठी करारबद्ध मजूर आणण्याची योजना मान्य झाली.
१६ नोव्हेंबर १८६० मध्ये पहिल्यांदा’टुरो’जहाजातून ३४२ जण पोर्ट नाताल(डरबन)इथे आले.त्यानंतर कलकत्त्याहून’बेल्वेडेअर’जहाजातून नाताल मध्ये मजूर आणण्यात आले.नाताल कॉलनीतील उसाच्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी हे करारबद्ध मजूर म्हणून आणण्यात आले होते.करार योजनेअंतर्गत अंदाजे १,५२,१८४ करारबद्ध भारतीय आले,ज्यांनी एकूण ३८४ फेऱ्या केल्या.शेवटचे जहाज’उम्लाझी’११ जुलै १९११ रोजी आले,मद्रास आणि कलकत्ता ही बंदरे प्रवासाला निघण्याची ठिकाणे होती.
१८६०: ‘टुरो’जहाजातून ३४२ भारतीय मजूर पहिल्यांदा पोर्ट नाताल(डरबन)येथे आणण्यात आले.
एकूण पाच दशकांच्या कालावधीत अंदाजे दोन लाख भारतीय करारबद्ध मजूर दक्षिण आफ्रिकेत आले,त्यातील काहींना करारबद्ध कोळसा खाण कामगार आणि रेल्वे कामगार म्हणूनही काम करावे लागले.बहुतांशी करारबद्ध मजूर तमिळ,तेलगू,भोजपुरी,हिंदीची अवधी बोली बोलणारे होते.त्यापैकी बहुसंख्य हिंदू होते,तर मुस्लिम आणि ख्रिश्चन अल्पसंख्यांक होते.तात्कालीन ब्रिटिश हिंदुस्थानातून जगभरात गेलेल्या करारबद्ध मजुरांना केवळ दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्व भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात भेदभावाला,वंश भेदाला सामोरे जावे लागले.उसाच्या मळ्यावरील करारबद्ध मजुरांना वारंवार वाईट वागणूक दिली जात असे आणि ते अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत राहत होते.ट्रान्सवाल केप कॉलनी,ऑरेंजFree Stateइथे वेगवेगळ्या प्रकारे भेदभावपूर्ण कायदे करण्यात आले.
१८९५ च्या भारतीय स्थलांतर कायद्यानुसार सोळा वर्षावरील सर्व बिगर-करारबद्ध भारतीय पुरुष आणि १३ वर्षावरील महिलांना ३ पौंडाचा वार्षिक कर भरावा लागत असे.हा कर बहुतेकांना परवडणारा नव्हता.त्यामुळे अनेकांना पुन्हा करारबद्ध होण्यास किंवा भारतात परतण्यास भाग पाडले गेले.भारतीयांना भारतात परत येण्यास प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नांमध्ये आर्थिक प्रोत्साहन तसेच भेद भावपूर्ण वागणूक याचा समावेश होता.
म.गांधी दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी हे दादा अब्दुल्ला झवेरी यांच्या एका कायदेशीर प्रकरणासाठी २४ मे १८९३ रोजी दक्षिण आफ्रिकेत आले.डरबन स्थित गुजराती व्यापाऱ्यांमधील व्यावसायिक वाद मिटवण्यासाठी ते तिथे काम करू लागले कामानिमित्त प्रिटोरियाला ७ जून १८९३ रोजी रेल्वेतून जाताना गोऱ्या लोकांसाठी राखीव असलेल्या फर्स्ट क्लास डब्यातून उतरण्यास नकार दिल्याने पीटर मारित्झबर्ग येथे त्यांना डब्याबाहेर फेकण्यात आले.त्यांनी ती रात निर्मनुष्य रेल्वे स्टेशनच्या वेटिंग हॉलमध्ये घालवली.या अपमानामुळे त्यांना दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या हक्कासाठी लढण्याची मोठी जबाबदारी घेण्याची आवश्यकता वाटली.त्यांनी डरबन मधील व्यापाऱ्यांना संघटित केले आणि त्यांच्या प्रेरणेने सन १८९४ मध्ये भारतीयांच्या मतदानाच्या हक्काच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी नाताल इंडियन काँग्रेसची स्थापना झाली. देशात तीन वर्षे वास्तव्य आणि संघर्ष केल्यानंतर ते १८९६ साली भारतात परतले.१९०२ साली त्यांनी पुन्हा दक्षिण आफ्रिकेत येऊन जोहान्सबर्गमध्ये’ट्रान्सवाल ब्रिटिश इंडियन असोसिएशनची’स्थापना केली.१९०३ साली त्यांनी वकिली सुरू केली.त्यासाठी त्यांनी जोहान्सबर्ग मधील सरकारी न्यायालयाजवळ असलेल्या रिजीक स्ट्रीटवर आपले कार्यालय स्थापन केले.तेथे त्यांनी भारतीयांवरील भेदभाव आणि वंशवादाची प्रकरणी हाताळली.
म.गांधी यांनी द.आफ्रिकेतील व्यापाऱ्यांना एकत्र आणले आणि ब्रिटिश सत्तेविरूद्ध जागृती केली
तेथील त्यांचे भारतीय सहकारी अहमद महंमद कंचलिया आणि थंबी नायडू होते.आशियाई लोकांना जाचक अटींमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल आवाज उठवण्यासाठी जोहान्सबर्गच्या मध्यवर्ती भागातील एम्पायर थिएटरमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली तीन हजारहून जास्त लोकांची एक जाहीर सभा झाली.आशियाई लोकांनी पास बाळगणे आणि बोटांचे ठसे देऊन नोंदणी करणे अनिवार्य करणाऱ्या एका अध्यादेशाच्या विरोधात ही सभा होती.
जानेवारी १९०८ मध्ये त्यांना ट्रान्सवाल सोडण्याचा आदेश दिला,त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांना दोन महिने’ओल्ड फोर्ट’तुरुंगात ठेवण्यात आले.दक्षिण आफ्रिकेमध्ये ते एकुण चार वेळा तुरुंगात गेले.ओल्ड फोर्टशिवाय व्होलक्रस्ट १९०८,प्रिटोरिया १९०९,व्होलक्रस्ट १९१३ साली त्यांना तुरुंगवास घडला.१९०८ साली त्यांनी हमीदिया मशिदीबाहेर पास जाळण्याची मोठी मोहीम राबवली.१९१० मध्ये त्यांनी सत्याग्रही तयार करण्यासाठी जोहान्सबर्गच्या बाहेरील भागात’टॉलेस्टॉय फार्म’ची स्थापना केली.११०० एकर जमिनीवर पसरलेला हा फार्म हर्मन कॅलनबॅक यांच्या मालकीचा होता.तेथे ८५ रहिवासी होते.स्थानिक पातळीवर उत्पादन केलेल्या वस्तू,साधी जीवनशैली,सुतार काम,हाताने करायच्या कामांचे धडे आणि प्रशिक्षण तिथे दिली जात असत.
१९१३ मध्ये महात्मा गांधींनी पास कायदे,ब्लॅक अॅक्ट,विवाह नोंदणी कायदा,३ पौंड कराचा कायदा,भारतीयांच्या हालचालीवरील निर्बंध,या अन्यायकारक आणि जाचक कायद्यांच्या विरुद्ध प्रसिद्ध होलक्रस्ट सत्याग्रह सुरू केला.यात महिलांनी प्रमुख भूमिका बजावली.कस्तुरबा गांधींसह तुरुंगात महिला गेल्या.अखेरील जनरल स्मटस यांनी माघार घेतली आणि १९१४ मध्ये इंडियन रिलीफ अॅक्ट मंजूर झाला.त्यामुळे आशियाई लोकांबाबत प्रचलित असलेले भेदभावपूर्ण कायदे रद्द झाले.आपले ध्येय साध्य करून गांधीजी १९ जुलै १९१४ रोजी केपटाउनहून भारतातकडे निघाले आणि नऊ जानेवारी १९१५ रोजी मुंबईत पोहोचले.त्यांनी या देशात तब्बल २१ वर्षे घालवली.
गांधी पर्वानंतरचा लढा डिसेंबर २६,जानेवारी २७ मध्ये दक्षिण आफ्रिकन सरकार आणि ब्रिटिश भारतीय अधिकाऱ्यांची एक गोलमेज परिषद झाली.जिथे असे मान्य करण्यात आले की,भारतीय सरकार भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी एक योजना तयार करेल आणि दक्षिण आफ्रिकन सरकार एका भारतीय सरकारी एजंटच्या देखरेखी खाली राहिलेल्या भारतीयांचे पुनर्वसन करण्यास सहमत झाले.तथापि अपेक्षेपेक्षा कमी भारतीय मायदेशी परत गेले आणि १९४० च्या दशकापर्यंत भारतीय आणि गोऱ्या लोकांमध्ये वांशिक तणाव धूमसत राहिला.झुलु लोकांच्या दंगलीत सुद्धा भारतीयांना लक्ष करण्यात आले.१९५० मध्ये लागू झालेल्या’ग्रुप एरिया’सारख्या वर्णभेदी कायद्यामुळे भेदभाव सहन करावा लागला.
म.गांधी यांचा पीटरमारित्झबर्ग येथील पुतळा
भारतीयांना जबरदस्तीने इंडियन टाऊनशिप मध्ये हलवण्यात आले आणि त्यांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले.त्यांना ऑरेंज फ्री स्टेट प्रांतात तर राहण्याची परवानगी नव्हती.राज्य धोरणाचा भाग म्हणून श्वेतवर्षीय दक्षिण आफ्रिकन लोकांच्या तुलनेत त्यांना निकृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यात आले.त्यांना’रंगीत’लोकसंख्येच्या भाग म्हणून परिभाषित केले गेले.१९६१ साला मध्ये त्यांना नागरिकत्व देण्यात आले.दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना’कुली’या वंशविद्वेषी नावाने संबोधले जात असे.
१९८३ साली त्रिसदनीय संसदेच्या स्वतंत्र आणि दुय्यम सभागृहात कलर्ड आणि भारतीय अल्पसंख्याकांना मर्यादित सहभागाची परवानगी देण्यात आली,तशी सुधारणा संविधानात करण्यात आली.भारतीय सभागृहाला हाऊस ऑफ डेलिगेट्स म्हटले जात असे.त्याला मर्यादित अधिकार दिले गेले.१९९० सालापासून झालेल्या वाटाघाटीद्वारे सर्व दक्षिणे आफ्रिकेच्या नागरिकांना मतदानाचा हक्क देऊन या स्वतंत्र व्यवस्था काढून टाकण्यात आल्या.वर्णभेद समाप्तीनंतर जे भारतीय नागरिक १९९४ पूर्वी देशाचे नागरिक होते आणि ज्यांच्यावर वर्णभेद प्रणालीद्वारे भेदभाव केला गेला त्यांना रोजगार समानतेच्या उद्देशाने सध्या’कृष्णवर्णीय’मानले जाते.म्हणजेच वर्णभेदाखाली ते वंचित म्हणून वर्गीकृत केले जातात आणि कृष्णवर्णीय नागरिकांच्या सक्षमीकरणाच्या योजनांसाठी त्यांना पात्र ठरवले जाते.
१९९४ साली वर्णभेद समाप्तीनंतर भारतीयांच्या स्थलांतराची तेथे लाट आली,असे ६० हजाराहून अधिक नागरिक अनिवासी/प्रवासी भारतीय(NRI)म्हणून येथे राहत आहेत.अनेक भारतीयांनी वर्णभेद विरोधी लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि काहींनी वर्णभेद दक्षिण आफ्रिकेत सत्तेची पदे भूषवली.
महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या विचारांचा दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेद चळवळीवर खोलवर परिणाम झाला १९५० सालानंतर ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष झाले.त्यांच्या पक्षाने महात्मा गांधी यांच्या अहिंसक प्रतिकार,सविनय कायदेभंग चळवळीच्या मार्गाने,वर्णद्वेष विरोधी लढा दिला.तेथील भारतीयांनी वर्णभेद राजवटी विरुद्ध आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या संघर्षात योगदान दिले होते..लढ्यातील विजयाचे श्रेय गांधींच्या विचारधारेला दिले.मंडेला एकदा म्हणाले होते, ‘गांधी त्यांच्या अहिंसेच्या वचन पद्धतीसाठी सर्वाधिक आदरणीय आहेत आणि काँग्रेस चळवळ या गांधीवादी तत्त्वज्ञान आणि खूप प्रभावीत होती.’लढ्याच्या समाप्तीनंतर लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकल्यानंतर १९९४ साली ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती झाले.त्यांना भारत सरकार तर्फे महात्मा गांधी शांतता पुरस्कार आणि भारतरत्न पुरस्काराने सन्समानित करण्यात आले..
१६ लाखांवर भारतीय वंशाचे लोक द.आफ्रिकेत २०२५ सालात ६.३० कोटी दक्षिण आफ्रिकेच्या लोकसंख्येत ८१.६०%कृष्णवर्णीय,८.५%मिश्र वर्षीय,२.६%भारतीय आणि ७.२%श्वेतवर्णीय नागरिकांची संख्या होती.१६.५४ लाख भारतीय वंशाचे लोक दक्षिण आफ्रिकेचे नागरिक आहेत.त्यात हिंदू ४०.९%,मुस्लिम २४.३%आणि धर्मीय ३१.६%नागरिक आहेत.सर्वात जास्त ११.५७ लाख भारतीय नागरिक क्वाझुलु-नाताल प्रांतात राहत.त्या खालोखाल गौतिंग प्रांतात ३.३० लाखावर,तर वेस्टर्न केप प्रांतात ८४ हजार पेक्षा जास्त नागरिक राहत आहेत.तर ईस्टर्न केप,लिम्पोपो,ग्युमलंगा प्रांतात तीस ते पस्तीस हजार या संख्येने भारतीय नागरिक सध्या राहत आहेत..
बहुतेक भारतीय दक्षिण आफ्रिकी लोकांची इंग्रजी ही पहिली भाषा आहे.जुन्या पिढीमधील तमिळ,गुजराती,मराठी,बंगाली,ओडिया,भोजपुरी,मल्याळम,उर्दू,हिंदी,तेलगु आणि इतर त्यांच्या मूळ भारतीय भाषा दुसरी भाषा आहे.शाळेत शिकवली जाणारी आफ्रिकांस किंवा झुलु सारखी अनिवार्य दुसरी भाषा एक तर बोलली जाते किंवा समजली जाते.भारतीयांच्या सध्याच्या पिढीमध्ये करीचे पदार्थ लोकप्रिय आहेत.१९ व्या शतकात दक्षिण आफ्रिकेत आलेल्या हजारो भारतीय मजुरांसोबत अनेक पदार्थ देशात आले.विविध प्रकारच्या करी,रोटी,मिठाया,चटण्या,समोसासारखे तळलेले पदार्थ, ‘बनी चाऊ’ ‘डरबन’मधील एक भारतीय पदार्थ ज्यात आतून पोकळ केलेल्या पावांमध्ये करी भरलेली असते.गरजेपोटी तयार करण्यात आलेल्या हा पदार्थ आता दक्षिण आफ्रिकन खाद्य संस्कृतीचा एक भाग बनला आहे आणि तो लोकप्रिय झाला आहे.जरी तरुण भारतीयांना भारतीय भाषा क्वचित बोलता किंवा समजत असल्या तरी इंग्रजी सबटायटल असलेले भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रम दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत.हे कार्यक्रम डीएसटीव्ही या सॅटेलाईट टेलिव्हीजन सेवेद्वारे प्रसारित केली जातात.त्यावर झी टीव्ही, B4U, NDTV,सोनी चॅनल आहेत.याशिवाय सन टीव्ही आणि के टीव्ही हे तमिळ चॅनेल आहेत.स्टेर-किनकोर सारख्या मोठ्या सिनेमा साखळ्यांनी २०००च्या दशकात बॉलीवूड चित्रपट दाखवायला सुरुवात केले.रेडिओ हिंदवाणी हे डरबन मधील एक सामुदायिक रेडिओ स्टेशन आहे.त्याद्वारे दक्षिण आफ्रिकेत हिंदी संस्कृती आणि भाषेचा प्रचार केला जातो.
क्रिकेटपटू हाशिम आमला
भारतीय वंशाची उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वे क्रिकेटपटू हाशिम आमला,कोडी चेट्टू,त्रिशा चेट्टी,दिनेश देवनारायन,रिवांश गोविंद,इमरान खान,केशव महाराज,रिवाल्डो मुनस्वामी,सेनुरन मुथूस्वामी,जीवेशन पिल्ले,तबरेझ शम्सी,प्रेनेलन सुब्रायन,जोनाथन वंडियार राजकारण-कादेर अस्माल,अमिना कचालिया,युसुफ कासिम,युसुफ दादू,अरुण मनीलाल गांधी,ईला गांधी,प्रवीण गोर्धन,सँडी कल्याण,अहमद कथराडा, केशव महाराज कसोटी,एकदिवसीय(वनडे)आणि वेंटी–२०(टी–२०)आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करतो.डावखुरा फिरकी गोलंदाज आणि खालच्या फळीतील फलंदाज म्हणून विशेष प्राविण्य मिळवलेल्या महाराजने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या किनारपट्टीवरील प्रांत असलेल्या क्वाझुलू–नतालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.त्याने २०१६ पासून कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली.देशांतर्गत क्रिकेटमध्ये,केशव डॉल्फिन्सकडून खेळतो आणि एसए२०(SA20)मध्ये डर्बनच्या सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व करतो.त्याचे वडील क्वाझुलू–नतालसाठी यष्टीरक्षक होते.
मॅक महाराज,रशिदा मंजू,एम जे नायडू,जय नायडू,कुमी नायडू,निली नायर रॉय पदयाची-माजी कॅबिनेट मंत्री,इब्राहिम पटेल,रवी पिल्ले,शेख शुभ्रथी,एन्वर सुरती,सोनी व्यंकट रत्नम. कला आणि माध्यम:झेन भीखा,गायक आणि गीतकार,लेसली-अँन ब्रांडेट-अभिनेत्री,गोपाला डेविस अभिनेता,दिग्दर्शक,ब्रायोनी गोवेंडर मिस युनिव्हर्स,देवी शंकर गोवेंडर,पत्रकार,माध्यम व्यवसायिक अधीर कल्याण अभिनेता,टॅटम केशवर-पॅशन मॉडल,मानसशास्त्रज्ञ,मिस साऊथ आफ्रिका २००८,ज्योती मिस्त्री-दिग्दर्शक,रियाद मुसा कॉमेडियन,डॉक्टर,केरीशनी नायकर-मिस दक्षिण आफ्रिका १९९७,आनंद नायडू-टेलिव्हिजन अँकर,वार्ताहर क्रीडा निवेदक,शशी नायडू-मॉडेल,जेलोशिनी नायडू-अभिनेत्री,करीना पटेल-अभिनेत्री निष्काळ पार्टी फल अभिनेत्री,स्केचि बोंगो संगीतकार,दीपक राम-संगीतकार,लिंडा रेड्डी अभिनेत्री,मेलीसा रेड्डी सादर कर्ती,टाईला गायिका,सागरीन पिल्ले रिअल अॅडमिरल,जयप्रकाश रेड्डी-लेखक,सोरामिनी कॅलिच्युरम-डीन.
उसाच्या मळ्यात काम करण्यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आलेले हिंदुस्थानातील करारबद्ध मजुरांचे वंशज,वर्णभेद लढ्याच्या विजयानंतर प्रजासत्ताक दक्षिण आफ्रिकेत आलेले प्रवासी भारतीय/ NRIमिळून १६ लाखापेक्षा जास्त भारतीय वंशाचे लोक द.आफ्रिकेच्या प्रगतीसाठी हातभार लावत आहेत,योगदान देत आहेत आणि भारतीय संस्कृतीची वाढ प्रजासत्ताक दक्षिण आफ्रिका देशामध्ये करीत आहेत.