सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी शासन ठाम – शंभूराज देसाई

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सातारा : शुगरटुडे

सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी राज्य शासन ठामपणे उभे असून, कारखान्याच्या हितासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिली. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सध्या सुमारे दोन लाख मे. टनांपर्यंत गाळपाची क्षमता गाठली असून, आगामी काळात ऊस क्षेत्र वाढवून तीन लाख मे. टनांपर्यंत गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी जाहीर केले.



लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दौलतनगर, ता. पाटण येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ते बोलत होते.


सभेस कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. रविराज देसाई, चि. आदित्यराज देसाई, शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख, अशोकराव पाटील, उपसभापती विजय पवार, बाळासाहेब पाटील, ॲड. मिलिंद पाटील, ॲड. डी. पी. जाधव, ॲड. बाबुराव नांगरे, शशिकांत निकम, प्रशांत पाटील, सुनील पानस्कर, बशीर खोंदू, अभिजित पाटील, चंद्रकांत पाटील, सुरज चव्हाण, विजय जंबुरे, कार्यकारी संचालक प्रदीप यादव यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समूहातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक उपस्थित होते.

आर्थिक शिस्त व उत्पादन खर्चावर नियंत्रण गरजेचे

पालकमंत्री ना. शंभूराज देसाई म्हणाले, कारखान्याने सभासदांच्या हिताला प्राधान्य देतानाच आर्थिक शिस्त आणि उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत व योग्य दर मिळणे आणि कारखान्याची आर्थिक स्थिती सक्षम राहणे, या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत.

सभासदांच्या हितासाठी एफआरपी पूर्ण करण्यासाठी कारखान्याला कर्ज घ्यावे लागले. मात्र, इतर कारखान्यांच्या तुलनेत आपल्या कारखान्याची भौगोलिक व नैसर्गिक परिस्थिती वेगळी आहे. ही वस्तुस्थिती सभासदांनी समजून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

“कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळाले पाहिजे,” ही स्वर्गीय आबासाहेबांची शिकवण होती. त्याच विचाराने कारखान्याच्या कामकाजाकडे पाहण्याची गरज आहे. कारखान्याची आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे आणि ऊस क्षेत्रात वाढ करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

सिंचन योजनांमुळे ऊस क्षेत्र वाढण्यास मदत


एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. शेतीच्या दृष्टीनेही अनेक महत्त्वाच्या सिंचन योजना मार्गी लागल्या आहेत. तारळे विभागातील शेतीला १०० मीटर उंचीपर्यंत पाणी पोहोचविणे, मोरणा-गुरेघर धरण प्रकल्पातील डावा व उजवा बंदिस्त कालवा यांसारख्या विविध सिंचन योजनांची कामे सुरू आहेत.

या योजनांमुळे पाटण तालुक्यातील शेतीला मोठा फायदा होणार असून, भविष्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल. ऊस क्षेत्र वाढल्यास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यालाही त्याचा निश्चितच फायदा होईल. सध्या सुमारे दोन लाख मे. टनांपर्यंत असलेले गाळप भविष्यात तीन लाख मे. टनांपर्यंत नेण्याचा विश्वास ना. शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

३५ टक्के ऊस बाहेर जाणे चिंतेची बाब

पाटण तालुक्यातील सुमारे ३५ टक्के ऊस कारखाना कार्यक्षेत्राबाहेर जाणे ही चिंतेची बाब आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकविलेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्यास द्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. देसाई यांनी केले.

कार्यक्षेत्रातील अधिकाधिक ऊस कारखान्याकडे आल्यास गाळप क्षमता वाढेल, कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि सभासदांच्या हिताचे निर्णय घेणे अधिक सुलभ होईल. त्यासाठी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाना प्रशासन यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्याच्या प्रगतीसाठी शासनस्तरावर आवश्यक ती मदत व सहकार्य करण्याची भूमिका कायम राहील. सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरत कारखान्याला भविष्यात अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

कर्ज न घेता ₹३ हजारांचा उच्चांकी दर

कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा) म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीतही आपला कारखाना चांगल्या पद्धतीने सुरू आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प दोन टप्प्यांत यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याने मागील गळीत हंगामात कमी कालावधीत दोन लाख मे. टन ऊस गाळप करण्यात आले.

ऊस विकास विभागाच्या माध्यमातून सभासदांना खतांचा पुरवठा केला जात आहे. मागील काही दिवसांत साखरेच्या दरात अचानक वाढ झाली. मात्र, महाराष्ट्रातील कारखान्यांनी उत्पादित केलेल्या साखरेपैकी सुमारे ९० टक्के साखरेची विक्री यापूर्वीच झालेली होती, ही वस्तुस्थितीही लक्षात घेणे आवश्यक आहे.

गेल्या गळीत हंगामात कारखान्याने कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी ₹३ हजारांचा दर ऊस उत्पादकांना दिला. प्रतिकूल परिस्थितीतही सभासद हिताचे धोरण राबविण्यात येत आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकविलेला संपूर्ण ऊस देसाई कारखान्यास गळितासाठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान कारखाना सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच ऊस पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत व्हा. चेअरमन पांडुरंग नलवडे यांनी केले. अहवाल वाचन वैभव जाधव यांनी केले, तर आभार बबनराव शिंदे यांनी मानले.

सभासद शेतकऱ्यांकडून सत्कार व अभिनंदनाचा ठराव

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक ना. शंभूराज देसाई व चेअरमन श्री. यशराज देसाई यांनी गत चार वर्षांत कारखान्यामध्ये काटकसरीचे धोरण, आर्थिक नियोजन आणि शिस्तबद्ध कामकाजाची पद्धत राबवून कारखान्याला सक्षम करण्याचा प्रयत्न केला.

गत गळीत हंगामात कोणतेही कर्ज न काढता कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी दर दिल्याबद्दल कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांच्या वतीने ना. शंभूराज देसाई साहेब व चेअरमन यशराज देसाई (दादा) यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचे अभिनंदन करणारा ठराव सभासदांच्या वतीने सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »