इथेनॉल प्रकल्पांचे भवितव्य धोक्यात; धोरणात्मक निर्णयाची मागणी

पुणे : राज्यातील साखरेच्या दरात झालेली वाढ ही प्रत्यक्ष बाजारातील व्यवहारावर आधारित नसून कृत्रिम असल्याचा दावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केला. साखर कारखान्यांकडून सध्या प्रतिक्विंटल ४९ रुपये ४५ पैसे दराने साखर विकली जात असल्याचे सांगत, किरकोळ बाजारात मात्र त्यापेक्षा अधिक दराने साखर ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
दरवाढीमुळे साखर उद्योगासह इथेनॉल क्षेत्रावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यात ऊसाचा टंचाईमुळे इथेनॉल निर्मितीला फटका बसण्याची शक्यता असून, इथेनॉल प्रकल्पांमध्ये सुमारे ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. साखरेच्या दरवाढीमुळे या प्रकल्पांच्या व्यवहार्यतेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता पाटील यांनी व्यक्त केली.
इथेनॉल प्रकल्पांमध्ये झालेली गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. तसेच साखर उद्योगाला आवश्यक ती भांडवली मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पुढील हंगामासाठी ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढविणे आवश्यक असून, त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.






