महावितरणच्या हलगर्जीपणाचा फटका; सहा एकर ऊस भस्मसात

माजलगाव : छोटेवाडी शिवरात गंगामसला आडगाव येथे वीज वितरण कंपनीकडून जाणाऱ्या मेन लाईनची तार तुटल्याने सुमारे सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
या आगीत छोटेवाडी शिवारातील गट सर्व्हे नंबर १०३ मधील शेतकरी एकनाथ माळेकर, हनुमंत माळेकर व भानुदास माळेकर यांच्या प्रत्येकी दोन एकर अशा एकूण सहा एकर ऊस पिकाचे नुकसान झाले. गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने पिके करपून गेली होती. त्यात हातातोंडाशी आलेल्या उसाचे पीक वीजवाहिनीची तार तुटून पडल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना लागल्याची भावना व्यक्त होत आहे. शेतामध्ये वाकलेले खांब, लोंबकळणाऱ्या तारा आणि तारेवर घर्षण होऊन वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे उस जळण्याचे प्रमाण परिसरात वाढले आहे.
वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ऊस जळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीने उसाची भरपाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जळालेल्या उसाचा पंचनामा करून महावितरण व महसूल विभागाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.






