भाऊसाहेब थोरात कारखान्याची सर्वसाधारण सभा उत्साहात!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५–२६ या आर्थिक वर्षाची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. या सभेत कारखान्याच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतानाच भविष्यातील वाटचालीची दिशा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित आणि कारखान्याच्या आर्थिक व औद्योगिक सक्षमतेबाबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शेतकऱ्यांनी एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे लक्ष्य ठेवावे

यापुढील काळातही साखर उद्योगासमोर मोठी आव्हाने असणार आहेत. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याबरोबरच त्या क्षमतेला सातत्याने पुरेसा आणि दर्जेदार ऊस उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याने एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ऊस लागवड, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, रोग-किडींचे नियंत्रण, सुधारित वाणांचा वापर आणि आधुनिक ऊस उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या शेतात उत्पादन वाढले, तर शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल; आणि कारखान्याला पुरेसा, दर्जेदार ऊस उपलब्ध झाला, तर कारखान्याची आर्थिक क्षमता अधिक मजबूत होईल. परिणामी कारखान्याची आर्थिक ताकद वाढवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे अधिक चांगले निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. त्यामुळे ‘एकरी १०० टन’ हे केवळ उत्पादनाचे लक्ष्य न राहता शेतकरी आणि कारखाना या दोघांच्या आर्थिक बळकटीचे सामूहिक उद्दिष्ट बनणे आवश्यक असं;असल्याचे मत माजी कृषीमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

दूरवरच्या शेतकऱ्यांचाही कारखान्यावर विश्वास

आज कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील, २०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील शेतकरीदेखील विश्वासाने आपला ऊस या कारखान्याला पुरवतात, ही कारखान्याच्या कार्यपद्धतीवरील विश्वासाची महत्त्वपूर्ण पावती आहे. मागील गळीत हंगामात कारखाना ११० दिवस कार्यरत राहिला. साखर उद्योगातील बदलत्या परिस्थितीचा विचार करून कारखान्याने केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता इथेनॉल, डिस्टलरी आणि वीजनिर्मिती यांसारख्या पूरक प्रकल्पांच्या माध्यमातून उद्योगाचे विविधीकरण करण्याच्या दिशेनेही प्रभावी पावले उचलली आहेत. यामुळे उपलब्ध ऊस आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या उपपदार्थांचा अधिक कार्यक्षम वापर करण्याबरोबरच कारखान्याच्या उत्पन्नाच्या विविध स्रोतांना बळकटी देण्याचा प्रयत्न झाला आहे.

उत्कृष्ट ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव

ऊस उत्पादनात उल्लेखनीय कामगिरी करून एकरी सर्वाधिक टन उत्पादन घेणाऱ्या शेतकरी बांधवांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रयोगशीलतेचा आणि कष्टांचा गौरव करण्याबरोबरच इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावेत, हा यामागील उद्देश आहे.

सभासदांचा विश्वास आणि सहकार्य हीच पुढील वाटचालीची ऊर्जा

सहकारी साखर कारखाना हा केवळ एक औद्योगिक प्रकल्प नसून शेतकरी, सभासद, कामगार, अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्या सामूहिक सहभागातून उभा राहिलेला संस्थात्मक प्रवास आहे. गेल्या अनेक दशकांपासून सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखान्यावर दाखविलेला विश्वास, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेले परिश्रम आणि पदाधिकाऱ्यांनी केलेले नियोजन यामुळेच कारखान्याची आजवरची वाटचाल शक्य झाली आहे.
मान्यवरांची उपस्थिती

ही वार्षिक सर्वसाधारण सभा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी चेअरमन माधवराव कानवडे, बाजीराव पाटील खेमनर, साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, कारखान्याचे व्हाइस चेअरमन पांडुरंग घुले, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद बांधव, ऊस उत्पादक शेतकरी तसेच कार्यकारी संचालक जे. बी. घुगरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, संचालक मंडळाचे सदस्य आणि पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »