राज्यातील पहिला ग्रीन एनर्जी प्रकल्प आवाडे कारखान्यात

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला अनुसरून राज्यातील पहिला ग्रीन एनर्जी प्रकल्प आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उभारण्यात येणार आहे. ‘महालक्ष्मी ग्रीन एनर्जी’ या नावाने हा प्रकल्प साकारला जाणार असून, त्यासाठी तब्बल ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.


या प्रकल्पात कारखान्यातील विविध प्रक्रियांमधून निर्माण होणाऱ्या टाकाऊ वस्तूंवर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील टाकाऊ वस्तूंचे व्यवस्थापन करून त्यांचे मूल्यवर्धन आणि पुनर्वापर करण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.


प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे १२०० जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याबरोबरच तांत्रिक, कुशल, अकुशल आणि विविध सेवा क्षेत्रांमध्येही रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
प्रकल्पासाठी सुमारे दोन वर्षांत विविध टप्प्यांवर चाचणी प्रक्रिया केली जाणार आहे. प्रक्रिया क्षमता, तांत्रिक बाबी आणि पर्यावरणीय निकषांची पूर्तता तपासल्यानंतर प्रकल्पाच्या व्यावसायिक कार्यान्वयनाला सुरुवात केली जाणार आहे.


पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीला चालना
‘महालक्ष्मी ग्रीन एनर्जी’च्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील पारंपरिक उद्योगांना पर्यावरणपूरक, तंत्रज्ञानाधारित आणि रोजगारनिर्मितीच्या दिशेने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे परिसराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासह हरित ऊर्जेच्या क्षेत्राला देखील बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »