महाकाली : बंद कारखान्याच्या चुरशीच्या निवडणुकीत सगरे पॅनलचा मोठा विजय

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अनिता सगरे गटाचे एकछत्री वर्चस्व; विरोधकांचा धुव्वा उडवत सर्व १७ जागांवर विजय

सांगली : शुगरटुडे
कवठेमहांकाळ येथील महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी अनिता सगरे पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला आहे. विरोधी ‘कारखाना बचाव पॅनेल’चा पूर्ण पराभव करत सत्ताधारी गटाने संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व १७ जागांवर विजय मिळवून कारखान्यावरील आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. तब्बल सात वर्षांपासून बंद असलेल्य या कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली.

या निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीत दोन्ही पॅनेलमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र, दुसऱ्या फेरीत कर्नाटकातील सीमावर्ती भागातील गावांमधील मतदारांनी सत्ताधारी गटाला मोठा पाठिंबा देत बहुमताने विजयी केले. सीमावर्ती भागातील मतदारांचा हा कौल या सत्तासंघर्षात अत्यंत निर्णायक ठरला.

ही निवडणूक अध्यक्षा अनिता सगरे यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली गेली. दुसरीकडे, संदीप गिड्डे पाटील, मिलिंद कोरे आणि गजानन कोठावळे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी ‘बचाव कृती समिती’ला एकही जागा मिळवता आली नाही.

नवनिर्वाचित १७ संचालक

विजयी ठरलेले १७ उमेदवार खालीलप्रमाणे आहेत: गटनिहाय

  • अनिता सगरे, अनुराधा सगरे, शंतनु सगरे
  • दीपकराव ओलेकर, काशिलिंग कोळेकर, भिमराव कोळेकर
  • मोहन खोत, दीपक चव्हाण, संभाजी पवार
  • कुमार पाटील, सागर पाटील, सुहास पाटील, प्रकाश पाटील-बंडगर
  • जीवन भोसले, अरविंद स्वामी, छाया पाटील, निखिल बनसोडे
गुलालाची उधळण अन् महांकाली मंदिरात दर्शन

निकालाची घोषणा होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला. विजयानंतर पॅनेलच्या प्रमुख अनिता सगरे, नवनिर्वाचित संचालक, प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि जिल्हा परिषद सदस्य संजय बनसोडे यांनी श्री महांकाली मंदिरात जाऊन सामूहिक दर्शन घेतले. दीर्घकाळ बंद असलेला हा कारखाना आता पुन्हा सुरू होऊन सभासदांच्या अपेक्षा कशा पूर्ण करतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »