उसाची कमतरता जाणवण्याची शक्यता; कारखान्यांसमोर आव्हान

पुणे : राज्यातील आगामी ऊस गाळप हंगामासाठी साखर कारखान्यांची तयारी सुरू झाली आहे. यंदा १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार साखर आयुक्तालयाच्या ऑनलाइन प्रणालीवर आतापर्यंत १२७ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.यामध्ये ६६ सहकारी आणि ६१ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा उसाची उपलब्धता कमी राहण्याची शक्यता असल्याने कारखान्यांमध्ये कार्यक्षेत्राबाहेरील ऊस मिळविण्यासाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
साखर आयुक्तालयाने ऑनलाइन प्रणालीद्वारे कारखान्यांकडून गाळप परवान्यासाठी अर्ज मागविले आहेत. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून पात्र कारखान्यांना नियमानुसार गाळप परवाना देण्यात येणार आहे.
यंदा मराठवाड्यासह काही भागांत पावसाची कमतरता जाणवत असून त्याचा परिणाम उसाच्या उपलब्धतेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस मिळविण्याचे आव्हान राहणार आहे.
साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगामाचे नियोजन करण्यात आले असून, प्राप्त प्रस्तावांची छाननी करून परिपूर्ण प्रस्तावांना प्राधान्य दिले जाणार आहे. कारखान्यांना जाहीर केलेल्या तारखेनुसार वेळेत हंगाम सुरू करण्याचे नियोजन करावे लागणार आहे.






