कचऱ्यातून इंधननिर्मिती; फुरसुंगीत उभारणार बायो-सीएनजी प्रकल्प

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : शहरातील ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याची क्षमता वाढविण्यासाठी फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपो परिसरात दररोज ३०० टन क्षमतेचा बायो-सीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) या प्रकल्पासाठी १२ एकर जागा देण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

प्रकल्पाची उभारणी, संचालन आणि देखभाल यांचा संपूर्ण खर्च बीपीसीएल करणार असल्याने पुणे महापालिकेवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. प्रकल्प उभारणीसाठी दोन वर्षे आणि त्यानंतर संचालन व देखभालीसाठी २५ वर्षे, अशा एकूण २७ वर्षांसाठी नाममात्र भाडेतत्त्वावर जागा दिली जाणार आहे. स्थायी समितीनंतर या प्रस्तावाला मुख्य सभेची मान्यता घेतली जाणार आहे.

पुणे शहरात दररोज सुमारे २,७०० ते २,८०० टन कचरा निर्माण होतो. त्यामध्ये एक हजार ते १,१०० टन ओल्या कचऱ्याचा समावेश आहे. मात्र, सध्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची महापालिकेची स्थापित क्षमता सुमारे ५४५ टन प्रतिदिन आहे. त्यामुळे उर्वरित मोठ्या प्रमाणातील कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होत आहे.

दररोज १,१०० टन ओला कचरा निर्माण होत असल्याचे आणि प्रक्रिया प्रकल्पांची कार्यक्षमता ८० टक्के असल्याचे गृहीत धरल्यास शहराला किमान १,३७५ टन प्रतिदिन प्रक्रिया क्षमता आवश्यक आहे. त्यामुळे बीपीसीएलचा प्रस्तावित ३०० टन क्षमतेचा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेता आणखी प्रकल्प उभारण्याची गरजही कायम राहणार आहे.

महापालिका प्रकल्पाला वर्गीकृत ओला कचरा पुरविण्यासह रस्ता, पाणी, वीज, मलवाहिनी आणि सीमाभिंत यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देईल. प्रत्यक्ष वीज आणि पाणी वापराचा खर्च बीपीसीएलकडून केला जाणार आहे. प्रकल्पातून तयार होणाऱ्या बायो-सीएनजीसह अन्य उपपदार्थांच्या विक्रीचे अधिकारही कंपनीकडे राहतील.

जागेच्या प्रश्नामुळे दीर्घकाळ रखडलेल्या या प्रकल्पाचा मार्ग स्थायी समितीच्या मंजुरीमुळे अखेर मोकळा झाला आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर शहराच्या ओला कचरा प्रक्रिया क्षमतेत दररोज ३०० टनांची भर पडणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »