MSC बँकेची ऐतिहासिक कामगिरी: ७०२ कोटींचा विक्रमी नफा; १० टक्के लाभांश

मुंबई | शुगर टुडे
देशातील सहकार क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (एमएससी बँक) वित्तीय वर्ष २०२५-२६ मध्ये आपली घोडदौड कायम ठेवत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. बँकेने या वर्षात तब्बल ७०२ कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा कमावला असून, ५,७४७ कोटी रुपयांचे सर्वाधिक नक्तमूल्य (नेटवर्थ) राखत देशातील सर्व सहकारी बँकांमध्ये आपले अव्वल स्थान अबाधित ठेवले आहे.
बँकेच्या ११५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना सलग १२ व्या वर्षी १० टक्के लाभांश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.
अतिउच्च नक्तमूल्यामुळे शासकीय गुंतवणुकीसाठी पात्र
मुख्य कार्यालयातील सहकार सभागृहात पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी बँकेचा वार्षिक आर्थिक आढावा सादर केला. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेच्या नक्तमूल्यात वर्षभरात ३५१ कोटी रुपयांची भरीव वाढ होऊन ते ५,७४७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
देशातील सहकारी बँकांमध्ये सर्वाधिक नक्तमूल्य असल्यामुळे राज्य बँकेला शासकीय बँकिंग व्यवहार, तसेच सार्वजनिक उपक्रम व विविध महामंडळांच्या अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी राज्य सरकारकडून विशेष पात्र ठरवण्यात आले आहे.
दिग्गजांची उपस्थिती आणि सायबर सुरक्षा केंद्राची उभारणी
या वार्षिक सभेला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, आमदार संजय भेंडे, आमदार अभिजित पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, माजी खासदार आनंदराव अडसूळ, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, राज्य बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे आणि मुख्य सरव्यवस्थापक अशोक माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीबद्दल प्रशासक आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. नवी मुंबईतील वाशी येथे राज्य बँकेने सहकारी बँकांसाठी उभारलेल्या अत्याधुनिक ‘सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर’चा राज्यातील जिल्हा मध्यवर्ती व नागरी सहकारी बँकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.





