एस. बी. भड, राजेश टोपे, पटेल, डॉ. भोसले यांना साखर उद्योग जीवनगौरव पुरस्कार

आवडल्यास ही बातमी शेअर करा
डीएसटीएचे २०२६ साठीचे पुरस्कार जाहीर; उद्योग, तंत्रज्ञान आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव होणार

पुणे । शुगरटुडे
देशातील साखर उद्योगातील तंत्रज्ञान, संशोधन, औद्योगिक नवोपक्रम आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिले जाणारे Deccan Sugar Technologists’ Association (India) (DSTA) चे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ते ७१ व्या वार्षिक अधिवेशनात प्रदान करण्यात येणार आहेत. साखर उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार असल्याची घोषणा डीएसटीएने केली आहे. ७१ वे वार्षिक अधिवेशन ८ आणि ९ ऑगस्ट रोजी पुण्यात होत आहे.

यंदाच्या साखर उद्योग गौरव पुरस्कार’ साठी एस. एस. इंजिनिअर्सचे चेअरमन एस. बी. भड, माजी मंत्री राजेश टोपे, गुजरातमधील श्री महुवा प्रदेश सहकारी खांड उद्योग मंडलीचे चेअरमन माणसिंगभाई पटेल, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले आणि अथणी शुगर्स लि. चे चेअरमन, कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

तांत्रिक उत्कृष्टता पुरस्कार’ सुभोध जोशी (सुविरॉन इक्विपमेंट्स), प्रमोदकुमार बेलसरे (इंडियाना सुक्रो-टेक) आणि श्रीपाद गंगावती यांना जाहीर झाला आहे. तर औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार’ शरद गोरे (मेरू इंडस्ट्रीज), संदीप कानिटकर (कॅन बायोसिस), अनुप केसरवानी (केमिकल सिस्टिम्स), टीकेआयएल इंडस्ट्रीज प्रा. लि. आणि स्वजीत इंजिनिअरिंग प्रा. लि. यांना प्रदान करण्यात येणार आहे.

सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार यंदा गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड, विलास सहकारी साखर कारखाना (युनिट-१) आणि जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. यांना जाहीर झाला आहे. तसेच विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना याला १०० टक्के यांत्रिक ऊसतोड या विशेष कामगिरीबद्दल विशेष गौरव करण्यात येणार आहे.

जीवनगौरव पुरस्कार बालाजी पबशेटवार, डॉ. स्वेन (तांत्रिक संचालक, उत्तर प्रदेश शुगर कॉर्पोरेशन), रमेश गंगाई, आर. एस. कुलकर्णी आणि आर. बी. माने यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच डीएसटीए एक्सेप्शनल सर्व्हिस अवॉर्ड एम. आर. कुलकर्णी, एस. बी. देव, जगदीश कुलकर्णी, डॉ. एस. एम. पवार आणि एस. डी. बोरुडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. ९० वर्षांवरील ज्येष्ठ सदस्य म्हणून घरपुरे, माणसिंगराव जाधव आणि पी.एन.आर. राव यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

डीएसटीएचे हे पुरस्कार साखर उद्योगातील तांत्रिक प्रगती, नवकल्पना, कार्यक्षमता आणि उद्योगातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव करणारे मानले जातात. देशभरातील साखर कारखाने, तंत्रज्ञ, संशोधक आणि उद्योगाशी संबंधित संस्थांसाठी हे पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जातात.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »