सोमेश्वर कारखान्याकडून विक्रमी गाळप

आवडल्यास ही बातमी शेअर करा

११.७९ टक्के उच्चांकी उतारा, १३.३१ लाख क्विंटल साखरनिर्मिती

पुणे – सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस टंचाईच्या परिस्थितीत ११ लाख टन गाळपाचा टप्पा पार करीत उत्तम कामगिरी नोंदवली आहे. कारखान्याने आतापर्यंत ११ लाख ३५ हजार टन ऊस गाळप पूर्ण केले असून, ११.७९ टक्के असा जिल्ह्यातील सर्वाधिक साखर उतारा प्राप्त केला आहे. १३ लाख ३१ हजार क्विटल साखरनिर्मिती करण्यात आली आहे.

रविवार (दि. १) अखेर १२० दिवसांत प्रतिदिन सुमारे ९ हजार ५०० टन गाळप क्षमतेने ही कामगिरी साध्य करण्यात आली. राज्यातील काही सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम बंद झाला असतानाही ‘सोमेश्वर ‘कडे पुरेसा ऊस उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या योग्य नियोजनामुळे यंदा १३ ते साडेतेरा लाख टन गाळपाचा टप्पा पार होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

‘सोमेश्वर’ने पहिली उचल एकरकमी ३ हजार ३०० रुपये प्रतिटन दिली आहे; मात्र फेब्रुवारी व मार्चमध्ये उशिरा तुटणाऱ्या उसाला अधिकचे प्रोत्साहन अनुदान देत आहोत. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून तुटणाऱ्या उसाला ३ हजार ४०० रुपये उचल अदा केली आहे. आता १ मार्चपासून तुटणाऱ्या उसाला ३ हजार ५०० रुपये प्रतिटन एकरकमी उचल देणार असल्याची घोषणा सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केली.

कारखान्याने हंगामाच्या प्रारंभीच साडेतेरा ते चौदा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट जाहीर केले होते. सभासदांनी अपवाद वगळता अन्य कारखान्यांना ऊस न दिल्याने गाळप मार्चअखेरपर्यंत सुरू राहील आणि उद्दिष्ट पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

जिल्ह्यात साखर उताऱ्यात सोमेश्वर प्रथम क्रमांकावर आहे. सहकारी साखर कारखाने सर्वच आघाड्यांवर सक्षमपणे कार्यरत असल्याचे दिसत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने ऊसतोड कामगार पहाटेपासूनच ऊस तोडीस प्राधान्य देत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »