पंचसूत्री अवलंबल्यास एकरी १२५ टन उत्पादन शक्य – संजीव माने
सातारा ः ऊस लागवडीची योग्य पद्धत , माती परीक्षणनुसार रासायनिक खतांच्या मात्रा, ठिबक सिंचनांद्वारे पाणी व्यवस्थापन आणि एकात्मिक किड रोग व्यवस्थापन या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास एकरी १२५ टन ऊस उत्पादन घेणे सर्व शेतकऱ्यानाही शक्य आहे, असे प्रगतिशील विक्रमवीर शेतकरी संजीव माने यांनी सांगितले.
निसराळे येथील कृषी विभाग ‘आत्मा’ व कृषी मित्र शेतकरी गट आयोजित एकरी १२५ टन ऊस उत्पादन स्पर्धा अभियान प्रारंभ कार्यक्रमात माने बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सह संचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ उपस्थित होते.
या ऊस पिक स्पर्धेतून पहिले तीन क्रमांक येणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीस म्हणून तुषार संच, खत बियाणे टोकण यंत्र, बॅटरीचलित फवारणी पंप, तसेच सहभागी सर्व शेतकऱ्यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये व जैविक खते देण्याचे रिवुलिस इरिगेशन, साई इंडस्ट्रिज, अग्रिनिर मशनरी, आरसीएफ कंपनीने जाहीर केले आहे.