एफआरपी : यंदा १०५ कारखाने -शंभर नंबरी-
पुणे : राज्यातील गाळप हंगाम संपला, तरी एफआरपी बिलांची प्रकरणे मात्र संपलेली नाहीत. १४ साखर कारखान्यांनी ५० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे. त्यांना साखर आयुक्तालयाने नोटिसा जारी केल्या आहेत. दुसरीकडे १०५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करून आपला नावलौकिक राखला आहे.
साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार,
- १०५ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे.
- शून्य ते ५० टक्के एफआरपी भरलेले १४ साखर कारखाने आहेत.
- ३१ मार्च २०२५ पर्यंत शेतकऱ्यांना २८६२४ कोटी रुपये (हँडलिंग आणि वाहतूक खर्चासह) एफआरपी रक्कम अदा करण्यात आली आहे.
- तर ३१ मार्च २०२५ रोजी, १४३२ कोटी रुपये एफआरपी रक्कम थकबाकी म्हणून शिल्लक आहे.
- २५ टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी रक्कम भरलेल्या साखर कारखान्यांची नावे: अहवालानुसार, फक्त एक साखर कारखाना आहे ज्याने २५ टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी रक्कम भरली आहे. त्या कारखान्याचे नाव ज्ञानेश्वर शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड, यशवंतनगर, ता. केज, जि. बीड आहे. या कारखान्याने १९.०१ टक्के एफआरपी रक्कम भरली आहे.