आ. रोहित पवारांचा कारखाना ऊस गाळपामध्ये राज्यात आघाडीवर

पुणे : महाराष्ट्रात ऊस गाळपामध्ये २०२४-२५ च्या हंगामातही आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखालील बारामती ॲग्रोने आघाडी घेतली आहे. एका कारखान्याचे गाळप गृहित धरले तर (समूह नव्हे) शेटफळगडे येथील बारामती ॲग्रोने यंदा सुमारे १६ लाख ९० हजार मे. टन ऊस गाळप करून राज्यातील अव्वल क्रमांक कायम राखला आहे. परंतु मागच्या हंगामाचा विचार करता, गाळपात मोठी घट झाली आहे. गत हंगामात बारामती ॲग्रोने २१ लाख ३५ हजार मे. टन ऊस गाळप केले होते.
दुसरीकडे अधिक एफआरपी देण्यामध्ये मात्र कारखान्याची बाजू काहीशी कमकुवत दिसते. ऊस गाळपामध्ये दुसरा क्रमांक जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा आहे. त्याने १६ लाख ७० हजार मे. टन गाळप केले आहे. तो सध्या भाडेतत्वावर असून, गुरू कमोडिटीज ही कंपनी चालवते. या कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वर्चस्व असल्याचे बोलले जाते. म्हणजे महाराष्ट्रात अजितदादा आणि पुतणे आ. रोहित पवार यांच्यामध्येच गाळपाची स्पर्धा आहे. मागच्यावेळी देखील जरंडेश्वर दुसऱ्या क्रमांकावर होता.
साखर उद्योग समूहाचा विचार करता, अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखालील ग्रुप राज्यात आघाडीवर आहे.
पुणे जिल्ह्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा अपवाद वगळता, इतर सर्व म्हणजे १९९ साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. त्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत…
१. सर्वाधिक ऊस गाळप करणारा साखर कारखाना – (साखर आयुक्तालयाच्या उपलब्ध माहितीनुसार), सर्वाधिक ऊस गाळप करणारा साखर कारखाना बारामती ॲग्रो लि. (शेटफळगडे, ता. इंदापूर, पुणे) हा आहे. या कारखान्याने १६,९०,०८६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.
- यंदाचा हंगाम (२०२४-२५):
- एकूण ऊस गाळप: ८५२.३४ लाख मेट्रिक टन
- एकूण साखर उत्पादन: ८०७.६१ लाख क्विंटल
- सरासरी साखर उतारा: ९.४८%
- मागील हंगाम (२०२३-२४):
- एकूण ऊस गाळप: १०७३.९ लाख मेट्रिक टन
- एकूण साखर उत्पादन: ११००.९३ लाख क्विंटल
- सरासरी साखर उतारा: १०.२५%
यंदाच्या हंगामातील ऊस गाळप आणि साखर उत्पादन मागील हंगामापेक्षा कमी झाले आहे. तसेच, सरासरी साखर उतारा देखील मागील हंगामापेक्षा कमी आहे.
५. या हंगामात एकूण २०० साखर कारखाने कार्यरत झाले होते. दिलेल्या अहवालानुसार (दि. १५/०४/२०२५ अखेर), पुणे जिल्ह्यातील विघ्नहर सहकारी लि., शिरोली, ता. जुन्नर हा एकमेव कारखाना सुरू आहे. त्याचा हंगाम मे च्या मध्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे.