साखर कारखान्याला कोट्यवधींची मदत; शेतकऱ्यांसाठी मात्र निकष का? आदित्य ठाकरेंचा सवाल

औसा : संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार केवळ पॅकेजच्या घोषणा करत आहे. मात्र सत्तेतील आमदारांच्या साखर कारखान्याला नियम आणि निकष बाजूला ठेवून कोट्यवधी रुपयांची मदत दिली जाते, असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. कारखान्याला मदत देताना लावलेले निकष शेतकऱ्यांनाही का लावले जात नाहीत, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
औसा तालुक्यातील तावशी ताड येथे शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांच्या ‘अन्नत्याग अन्नदात्यासाठी’ उपोषणाला ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रश्नावरून सरकारवर टीका केली.
किल्लारी येथील नीळकंठेश्वर साखर कारखान्याला विशेष बाब म्हणून १८ कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आल्याचा उल्लेख करत ठाकरे यांनी या निर्णयातील निकषांबाबत प्रश्न उपस्थित केला. शेतकरी अन्नदाता असल्याने त्याला केवळ कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्तीची गरज आहे, असे ते म्हणाले. मदतीच्या घोषणा झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात किती रक्कम पोहोचली, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
घाडगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेतकऱ्यांसाठीच्या लढ्यात सोबत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी आमदार अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील, भगवान मकणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.






