विघ्नहर’चा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून

ओझर/जुन्नर : यंदाच्या हंगामात ऊस लागवड नेहमीपेक्षा लवकर सुरू झाली असली, तरी कमी पाऊस आणि हुमणी किडीच्या प्रादुर्भावामुळे एकरी ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, असे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी सांगितले.
कारखान्याच्या ४१व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी झाले. संचालक बाळासाहेब पांडुरंग घुले आणि त्यांच्या पत्नी वंदनाताई घुले यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. कारखान्याचे गाळप १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्याचे नियोजन आहे.
शेरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा १० लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ५,००० वरून ७,५०० मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आली असून, हंगामात दररोज ८,००० ते ८,५०० मेट्रिक टन ऊस गाळण्याचे नियोजन आहे.
साखर उत्पादनात घट झाल्यास उसापासून इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांचा केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणीही शेरकर यांनी केली.






