मारुती महाराज कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

लातूर : संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याच्या संचालक मंडळ अधिकारी यांनी काटकसर करून कारखान्याची प्रगती केली आहे.  या संचालक मंडळाच्या मागणीचा विचार करत मारुती महाराज कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. कारखान्याची जशी आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल, त्यानुसार कर्मचाऱ्यांना आणखी पगारात वाढ केली जाईल, असे आश्वासनही राज्याचे माजी मंत्री तथा मांजरा परिवाराचे मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख यांनी यावेळी दिले. ते औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन शनिवारी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आशिर्वादाने चाळीस वर्षांपूर्वी मांजरा परिवारातील मांजरा सहकारी साखर कारखाना उभा राहिला, यानंतर रेणा व मारुती महाराज साखर कारखाना एकाच वेळी उभारला गेला. काही तांत्रिक अडचणींमुळे मारूती महाराज कारखाना मागे राहिला; पण आज मांजरा परिवारातील इतर कारखान्याच्या बरोबरीने मारुती महाराज कारखानाही आपली यशस्वी वाटचाल करीत आहे. या वर्षीच्या हंगामात मांजरा परिवारातील इतर कारखान्याच्या बरोबरीने मारुती महाराज चांगला भाव देण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वासही देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

औसा तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी, ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आमच्या संचालक मंडळाने काटकसरीने हा कारखाना चालवला असून एक टेंडरमध्ये तब्बल सहा कोटीची बचत संचालक मंडळाने केली आहे. सदरील टेंडर महाराष्ट्रातील एका चांगल्या कंपनीला मिळाले असून पारदर्शक कारभारातून एका चांगल्या स्थितीत मारुती महाराज कारखाना असून चालू गळीत हंगामात कारखान्याकडून अधिकाधिक उसाचे गाळप करण्याचे नियोजन असल्याचे दिलीपराव देशमुख यांनी सांगितले.

या कार्यक्रमप्रसंगी विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार वैजनाथजी शिंदे, राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, रेणा साखरचे उपाध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, उपाध्यक्ष सचिन पाटील, कार्यकारी संचालक सदाशिव बहीर, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, जिल्हा मजूर संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, संभाजी सुळ, सचिन दाताळ, मांजरा साखर कारखान्याचे संचालक सचिन शिंदे, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक गणपती बाजुळगे, श्यामराव साळुंके, रमेश वळके पाटील, अमित माने, अॅड. बाबासाहेब गायकवाड, विलास काळे, संतोष भोसले, गोविंद सोनटक्के, चंद्रसेन पाटील अनिल पाटील भरत माळी शिवाजी बिराजदार, मांजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई जागृती शुगरचे जनरल मॅनेजर गणेश येवले, विलासराव देशमुख शुगर इंडस्ट्रीज मंगरूळचे (कंचेश्वर) जनरल मॅनेजर सतीश वाकडे, जागृतीचे मुख्य शेतकी अधिकारी रामानंद कदम आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक गणपतराव बाजूळगे यांनी मांडले कार्यक्रमास खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी कामगार उस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »