दोनशे पैकी १७३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात सुरुवातीला एकूण 200 साखर कारखाने सुरू झाले होते त्यामध्ये 99 सहकारी आणि 101 खासगी कारखान्यांचा समावेश होता. त्यातील १७३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. गत हंगामात आतापर्यंत ११४ कारखान्यांचे गाळप उरकले होते.

या हंगामात साखर कारखान्यांनी 838.41 लाख टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत 792.59 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, असे पुण्यातील साखर आयुक्तालयातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचा एकूण सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 9.45 टक्के इतका आहे. गत हंगामात तो १०.१८ होता.

गाळप हंगाम समाप्त करणाऱ्या कारखान्यांमध्ये कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील सर्व कारखान्यांचा समावेश आहे. पुणे विभागातील 24, अहिल्यानगर विभागातील 20, छत्रपती संभाजीनगर विभागातील 19, नांदेड विभागातील 24 तसेच अमरावती विभागातील एका कारखान्याचा समावेश आहे.

मागील हंगामात याच काळात 207 साखर कारखाने सुरु झाले होते. यात 103 सहकारी तसेच 104 खासगी कारखान्यांचा समावेश होता. या कारखान्यांनी 1037.18 लाख टन उसाचे गाळप करून 105.58 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. राज्याचा एकूण सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 10.18 टक्के इतका होता. एकूण 114 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम समाप्त केला होता.

कोल्हापूर विभागातील सर्व साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. 40 कारखान्यांनी (14 खासगी व 26 सहकारी) मिळून 201.97 लाख टन उसाचे गाळप करून 11.08 टक्के साखर उताऱ्यासह 22.40 लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

पुणे विभागात 31 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 18 सहकारी आणि 13 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या विभागात 199.24 लाख टन उसाचे गाळप झाले असून साखर उत्पादन 191.26 लाख क्विंटल झाले आहे. साखरेचा उतारा सरासरी 9.6 टक्के आहे. या विभागातील 24 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.

सोलापुर विभागातील सर्व साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. 45 साखर कारखान्यांनी (17 सहकारी आणि 28 खासगी) मिळून एकूण 130.36 लाख टन उसाचे गाळप करून 8.11 टक्के उठऱ्यासह 10.57 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.

अहिल्यानगर विभागात 26 कारखाने कार्यरत असून त्यापैकी 14 सहकारी आणि 12 खासगी आहेत. या कारखान्यांनी 112.97 लाख टन उसाचे गाळप केले आहे. एकूण 100.31 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा उतारा 8.88 टक्के आहे. या विभागातील 20 साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात 22 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 13 सहकारी आणि 9 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 80.32 लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी 64.29 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा उतारा 8 टक्के आहे. या विभागातील 19 साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.

नांदेड विभागात 10 सहकारी आणि 19 खासगी अशा एकूण 29 कारखान्यांनी 98.49 लाख टन उसाचे गाळप केले असून 9.66 टक्के साखर उताऱ्यासह 95.1 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागातील 24 साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे.

अमरावती विभागात 4 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून त्यात 1 सहकारी आणि 3 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 11.27 लाख टन उसाचे गाळप केले असून, 10.03 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा उतारा 8.9 टक्के आहे. या विभागातील एका साखर कारखान्याचे गाळप बंद झाले आहे.

नागपूर विभागात 3 खासगी कारखाने सुरु असून त्यांनी 3.55 लाख टन उसाचे गाळप करून 1.81 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वात कमी 5.1 टक्के इतका आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »