कोल्हापूर जिल्ह्यात ३२ एकरांतील ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

कोल्हापूर : तब्बल २० एकरांतील ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाल्याची घटना कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे सोमवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास घडली. या आगीत एकूण ४५ शेतकऱ्यांचे २० लाखांहून अधिक नुकसान झाले. दरम्यान, उसाला आग लागण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. महावितरणविरोधात संताप व्यक्त करत संबंधित शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
मौजे कसबा सांगाव (ता. कागल) येथे जवळपास ४५ शेतकऱ्यांचा २० ते २५ एकर ऊस हा तोडणीसाठी तयार आहे. यातच सोमवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली झालेल्या शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली. या आगीत ऊस जवळपास संपूर्ण खाक झाल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; मात्र वाऱ्यामुळे उसाला लागलेली आग अधिकच पसरत गेली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पंचतारांकित औद्योगिक क्षेत्राचे अग्निशमन दल आणि शाहू कारखान्याचे अग्निशमन पथक दाखल झाले. मात्र, उसाच्या दाट शेतातून अग्निशमन गाड्या फडात पोहोचू शकल्या नाहीत. कागल नगरपरिषदेची गाडी आकाराने लहान असल्याने तिच्या साहाय्याने काही प्रमाणात आटोक्यात आणली.
या आगीत बाजीराव स. पाटील, सर्जेराव स. पाटील, अमोल पाटील, तानाजी पाटील, कृष्णात पाटील, जबदस्त पाटील, बंदोबस्त पाटील, श्यामराव पाटील, धनाजी पाटील, मारुती मगदूम, कृष्णा मगदूम, अनिल पाटील, बाळासो मगदूम, संजय मगदूम, प्रकाश मगदूम, कुमार मगदूम, सुनील पाटील, भगवान जाधव, राहुल पाटील, दिलीप जाधव, संजय जाधव, विजय जाधव यांचा ऊस जळाला.
पाडळी खुर्द येथे आगीत १२ एकर ऊस जळून खाक
कोपार्डे: पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे १२ एकरवरील उसाचे पीक जळून खाक झाले. यात जवळपास १२ ते १५ लाखांचे नुकसान झाले. येथील शेरी नावाच्या शेतामध्ये मंगळवारी दुपारी आग लागली. आग लागल्याचे समजताच शेतकऱ्यांनी धाव घेतली. मात्र वाऱ्याची झुळुक व उष्णता यामुळे आग पसरत गेली. आगीचे व धुराचे लोळ प्रचंड होते. शेतकऱ्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. विलास हरी पाटील, गणपती हरी पाटील, समर्थ संजय पाटील, पांडुरंग यशवंत पाटील यासह अन्य चार शेतकऱ्यांचे नुकसान झाले.





