पोस्टर स्पर्धा पुरस्कारांनी ‘व्हीएसआय’च्या प्रदर्शनाची सांगता
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) १२ ते १४ जानेवारी असे तीन दिवस आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय साखर उद्योग प्रदर्शनाची सांगता रविवारी झाली. शेवटच्या टप्प्यात पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना रोख पुरस्कार देण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर ‘व्हीएसआय’ महासंचालक संभाजी कडू पाटील, सल्लागार शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते. पोस्टर स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला होता. विविध प्रकारांमध्ये एकूण २४ प्रकारांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामूहिक पहिल्या पुरस्काराचे मानकरी मुरुगन ठरले.
‘व्हीएसआय ’ने आयोजित केलेले ही तिसरी आंतरराष्ट्रीय साखर उद्योग परिषद आणि प्रदर्शन होते. दर तीन वर्षांनी या परिषदेचे आयोजन केले जाते. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत सुमारे २६ देशातील प्रतिनिधींनी भाग घेतला, तर साखर उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या भारतातील नामवंत कंपन्यांनी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला.
वातनुकूलित, अलिशना तीन डोममध्ये उद्योग प्रदर्शन भरवण्यात आले होते. सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांसह इंजिनिअरिंग आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या बड्या कंपन्यांचेही स्टॉल प्रदर्शनात होते. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या स्टॉलने सर्वांचे लक्ष आकर्षून घेतले. श्री विठ्ठल मूर्तीच्या पार्श्वभूमीवर सजवण्यात आलेला स्टॉल खूपच देखणा होता. त्यानंतर सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचा स्टॉल ‘कॉर्पोरेट लूक’ सादर करणारा होता.
(‘शुगरटुडे’ने या संपूर्ण परिषदेचे आणि प्रदर्शनाचे व्हिडिओ चित्रीकरण केले आहे, त्याबाबत सविस्तर वृत्तांत लवकरच)