60 लाख टन साखर निर्यातीला परवानगी
निर्यात प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना
नवी दिल्ली – अखेर बहुप्रतीक्षित निर्णय झाला. केंद्रीय अन्न मंत्रालयाने रविवारी 2022-23 च्या हंगामात 60 लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. त्यामुळे साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळू शकेल अशी आशा आहे.
31 मे पर्यंत पहिला टप्पा
अन्न मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे, की 1 नोव्हेंबर ते 31 मे 2023 पर्यंत 60 लाख टन निर्यात कोट्याला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये देशांतर्गत विक्री कोटा बदलून स्वत: किंवा निर्यातदारांमार्फत निर्यात करण्याचा पर्याय साखर कारखानदाराना असेल.
दरम्यान, साखर उद्योग संघटना ISMA ने म्हटले आहे की, यावर्षी देशात 36.5 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे आणखी अधिक साखर निर्यातीला अनुमती द्यायला हवी. .
यापूर्वी, 2019-20, 2020-21 आणि 2021-22 साखर हंगामाच्या तीन विपणन सत्रांसाठी साखरेच्या तीन वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या 18.23 टक्के एकसमान निर्यात कोटा वाटप करण्यात आला होता. साखर हंगाम ऑक्टोबर ते पुढील वर्षी सप्टेंबर पर्यंत चालते.
रविवारी जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील ऊस उत्पादनाच्या उपलब्ध प्राथमिक अंदाजांच्या आधारे निर्यात कोटा निश्चित करण्यात आला आहे.
“देशातील ऊस उत्पादनाचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल आणि ताज्या उपलब्ध अंदाजांच्या आधारे साखर निर्यातीच्या प्रमाणात पुनर्विचार केला जाऊ शकतो,” मंत्रालयाने म्हटले आहे की, कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर पेमेंट करता येईल यासाठी वाटप केलेला साखर कोटा त्वरीत निर्यात करावा.
2022-23 हंगामासाठी, मंत्रालयाने म्हटले आहे, की घरगुती वापरासाठी साखरेची उपलब्धता 27.5 दशलक्ष टन असेल, तर 50 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी जाईल आणि हंगामाच्या शेवटी सुमारे 50 लाख टन साखर शिल्लक असेल.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साखरेचे उत्पादन सुरू झाले आहे, तर उत्तर प्रदेश आणि इतर ऊस उत्पादक राज्यांमध्ये ते आठवडाभरात सुरू होईल.
भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे आणि निर्यातीच्या बाबतीत ब्राझीलनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्येही यंदा उसाचे उत्पादन कमी झाले असून त्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय साखरेची मागणी आणखी वाढली आहे.
देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्याने किमती नियंत्रित ठेवण्यासाठी यावर्षी निर्यात कोटा कमी केला जाईल, असे सरकारने आधीच सूचित केले होते. गेल्यावर्षी 112 लाख टन साखर निर्यात केली होती. तो उच्चांक आहे.