राजू शेट्टींसह ८० ऊस आंदोलकांची निर्दोष मुक्तता

कोल्हापूर : तब्बल १२ वर्षांनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८० ऊस आंदोलकांची जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. ऊस दर आंदोलनात झालेल्या जाळपोळीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आंदोलकांनी जिल्हा न्यायालयाबाहेर एकच जल्लोष केला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पुन्हा बळ मिळाल्याची भावना माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
नोव्हेंबर २०१२ मध्ये इंदापूर (जि. पुणे) येथे ऊस दर आंदोलनादरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. ११ नोव्हेंबर २०१२ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जेलभरो आंदोलनाची हाक दिली होती. त्यावेळी पुणे-बंगळुरू महामार्गावर सांगली नाका येथे जमलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी शिरोली नाक्यासह कूर आणि दिंडनेर्ली येथे तीव्र आंदोलने झाली. तसेच वसगडे आणि इंदापूर येथेही वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याने एकूण ३ हजार ७८१ आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते. यात शिरोली नाका परिसरातील ८० आंदोलकांचा समावेश होता. याच पार्श्वभमीवर त्यांच्यावर हिंसक आंदोलनाचा खटला दाखल करण्यात आला होता.
जेलभरो आंदोलनामुळे सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आंदोलन थांबल्यानंतर आंदोलनस्थळी पोहोचलेल्या समाजकंटकांनी तोडफोड करून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला. संघटनेच्या वतीने अॅड. ब्रिजेश शास्त्री, अॅड. श्रेणिक पाटील, अॅड. अमेय मकरे, अॅड. सुवर्णभद्र पाटील आदींनी कामकाज पाहिले.हा मुद्दा न्यायालयात पटवून देण्यात यश आल्याचे आंदोलकांच्या वकिलांनी सांगितले. या खटल्याचा निकाल देताना जिल्हा न्यायाधीश (२) कश्यप यांनी राजू शेट्टी यांच्यासह ८० आंदोलकांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.
दरम्यान, गेल्या १२ वर्षांत शेतकऱ्यांनी न्यायालयात ८७ तारखांना हजेरी लावली. सुरुवातीला पेठ वडगाव येथील न्यायालयात सुनावण्या झाल्या. त्यानंतर हा खटला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात वर्ग झाला. सर्व आंदोलकांची निर्दोष मुक्तता झाल्याने चळवळीला पुन्हा बळ मिळाल्याची भावना माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व्यक्त केली.






