उसाची मोळी नेताना बांधावरून पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

कोल्हापूर : शेतात काम करत असताना काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे घडली आहे. उसाची मोळी डोक्यावरून वाहून नेताना बांधावरून तोल गेल्याने संजय भरत कोळी (वय ४२) या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
नेमकी घटना काय?
संजय कोळी हे आपल्या शेतात नवीन ऊस लागणीची तयारी करत होते. लागण करण्यासाठी ते डोक्यावरून उसाची मोळी वाहून नेत असताना, अरुंद बांधावरून चालताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या शरीराला गंभीर इजा झाल्याने ते निपचित पडले.
उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
कुटुंबीयांनी प्रसंगावधान राखून त्यांना तातडीने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना ‘मृत घोषित’ केले. संजय कोळी हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली असून, एका कष्टाळू शेतकऱ्याच्या अशा अकाली निधनाने संपूर्ण राधानगरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






