भारतीय साखर उद्योगाला निर्यातीची सुवर्णसंधी!

युद्धाचा अनपेक्षित फायदा!
पुणे : मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक तेल बाजारात क्रूड ऑईलचे दर भडकले असून, ब्राझीलने साखर उत्पादनाऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळण्याची तयारी सुरू केली आहे. या घडामोडीमुळे जागतिक बाजारात साखरेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, भारताला निर्यातीसाठी मोठी संधी मिळू शकते, असे उद्योग विश्लेषकांचे मत आहे.
देशांतर्गत बाजारात साखरेचा भाव किलोला ४० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी हंगामासाठी भारताकडे सुमारे ६५ लाख मेट्रिक टन साखरेची शिल्लक असून, दक्षिण आफ्रिका व श्रीलंका यांच्यासोबत निर्यात करारही सुरू झाले आहेत.
ब्राझीलकडील उत्पादन इथेनॉलकडे वळल्यास जागतिक बाजारात भारतीय साखरेला उठाव मिळेल. निर्यातीचा कोटा १५ ते २० लाख मेट्रिक टनांनी वाढविल्यास कारखानदारीवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल.
गतवर्षी ६० डॉलर्स प्रति बॅरल असलेले क्रूड दर यंदा १०० डॉलर्सच्या पुढे गेले आहेत. या परिस्थितीत भारताला जागतिक साखर बाजारात दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक म्हणून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.






