साखर उद्योगात मोठा टर्निंग पॉईंट!

निरानी-ओंकार समूहांची हातमिळवणी
पुणे : एमआरएन (निरानी) ग्रुपचे कार्यकारी संचालक संगमेश निरानी व संचालक विशाल निरानी यांनी पुणे येथील ओंकार शुगर ग्रुपच्या मुख्य कार्यालयाला भेट देत साखर उद्योगाच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा केली. नुकत्याच झालेल्या या महत्वाच्या बैठकीत उद्योगसमूहांमधील परस्पर सहकार्य, तांत्रिक प्रगती आणि शाश्वत विकासाच्या संधींवर सखोल विचारमंथन करून भविष्यातील सहकार्याचे संकेत दिले.
ओंकार शुगर ग्रुपच्या वतीने विविध उपक्रम, उत्पादनक्षमतेतील वाढ, तसेच उद्योग क्षेत्रातील योगदानाची माहिती या वेळी सादर करण्यात आली. बदलते औद्योगिक ट्रेंड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मूल्यवर्धित उत्पादनांची वाढती गरज आणि पर्यावरणपूरक धोरणांची अंमलबजावणी या मुद्द्द्यांवर विशेष भर देण्यात आला.
साखर उद्योग अधिक स्पर्धात्मक करण्यासाठी नवकल्पना व संशोधनाची गरज अधोरेखित करत दोन्ही समूहांनी भविष्यात गुंतवणूक, संशोधन व तांत्रिक सहकार्याच्या माध्यमातून उद्योग अधिक सक्षम करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. या सहकार्यामुळे उद्योगात नवीन संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
अध्यक्ष बाबूराव बोत्रेपाटील म्हणाले, ‘निरानी ग्रुपसारख्या प्रगत आणि दूरदृष्टी असलेल्या उद्योगसमूहासोबत संवाद साधण्याची ही महत्त्वाची संधी आहे. भविष्यातील सहकार्यामुळे साखर उद्योगासोबतच शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल.’ दोन्ही समूहांनी ही बैठक भविष्यातील सहकार्याच्या नव्या दालनांना प्रारंभ करणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.






