आज लक्ष्मी पूजन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, नोव्हेंबर १, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक १०, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:३९ सूर्यास्त : १८:०५
चंद्रोदय : चंद्रोदय नहीं चंद्रास्त : १७:५३
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : आश्विन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अमावस्या – १८:१६ पर्यंत
नक्षत्र : स्वाती – ०३:३१, नोव्हेंबर ०२ पर्यंत
योग : प्रीति – १०:४१ पर्यंत
करण : नाग – १८:१६ पर्यंत
द्वितीय करण : किंस्तुघ्न – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : तूळ
राहुकाल : १०:५६ ते १२:२२
गुलिक काल : ०८:०५ ते ०९:३०
यमगण्ड : १५:१३ ते १६:३९
अभिजितमुहूर्त : ११:५९ ते १२:४५
दुर्मुहूर्त : ०८:५६ ते ०९:४२
दुर्मुहूर्त : १२:४५ ते १३:३०
अमृत काल : १७:४२ ते १९:२९
वर्ज्य : ०६:५९ ते ०८:४६

आज श्री लक्ष्मीकुबेर पूजन आणि श्री लक्ष्मीकुबेराचे ध्यान करावे

। ध्यायामि तां महालक्ष्मीं कर्पूरक्षोदपाण्डुराम् ।
शुभ्रवस्त्रपरीधानां मुक्ताभरणभूषिताम् ।।
पङ्कजासनसंस्थानां स्मेराननसरोरुहाम् ।
शारदेन्दुकलाकान्तिं स्निग्धनेत्रां चतुर्भुजाम् ।।
पद्मयुग्माभयवरव्यग्रचारुकराम्बुजाम् ।
अभितो गजयुग्मेन सिच्यमानां कराम्बुना ।।

समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. याखेरीज चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते. व्यापारी वर्गात यापूजेच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.

आज लक्ष्मी पूजन आहे.

आश्विन वद्य अमावस्येच्या मध्यरात्री भगवान महावीरांना राजगृहाजवळील पावा वा पावापुरी येथे निर्वाण प्राप्त झाले. हा दिवस जैन लोक दिवाळी म्हणून साजरा करतात. त्यांच्या निर्वाणानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून वीर संवताला सुरुवात झाली.

आज भगवान महावीर निर्वाण दिन आहे.

जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक बितीभूषण बंदोपाध्याय – चोवीस परगणा जिल्ह्यातील मुरारिपूर गावी त्यांचा जन्म. बनग्राम हायस्कूलमधून १९१४ साली ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले व कलकत्त्याच्या रिपन कॉलेजमधून १९१८ साली बी.ए. झाले. हुगळी जिल्ह्यातील जांगिपाडा गावच्या शाळेत प्रथम शिक्षक म्हणून लागले. त्यानंतर सोनारपूर हरिनाभि स्कूल, कलकत्त्याचे खेलात्चंद्र मेमोरियल स्कूल व शेवटी बरॅकपूरजवळील गोपालनगर हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. मध्यतरी भागलपूरच्या खेलात् घोष इस्टेटचे उप-तालुकाधिकारी म्हणून काही काळ त्यांनी काम केले.

या इस्टेटचे काम बघत असताना भागलपूरला लिहिलेली पथेर पाँचाली (१९२९) हीच बिभूतिभूषण यांची प्रथम कादंबरी होय. याशिवाय कथा, कादंबऱ्या, शिशुसाहित्य इ. प्रकारांतील त्यांचे पन्नासाहून अधिक ग्रंथ प्रकाशित आहेत. यांपैकी मेघमल्लार (१९३१) मौरीफूल (१९३२), जात्राबदल (१९३४), ताल नवमी (१९४४) हे कथासंग्रह आणि अपराजित (१९३१), दृष्टीप्रदीप (१९३५), आरण्यक (१९३८), आदर्श हिंदू हॉटेल (१९४०), देवयान (१९४४), केदार राजा (१९४५), इछामती (१९४९) या कादंबऱ्या विशेष महत्त्वाच्या आहेत.

वंगदेशाच्या मातीत रूजलेला चौफेर अनुभव व तितकीच स्वाभाविक सहजसुंदर भाषाशैली या गुणांच्या संगमामुळे विभूतिभूषणांचे साहित्य वाचकाला मोहून टाकते. पथेर पाँचाली, अपराजित व आरण्यक या तीन कादंबऱ्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ कलाकृती होत. विशेषतः पथेर पाँचाली या कादंबरीवर सत्यजित रे यांनी चित्रपट काढल्यामुळे ही कादंबरी विश्वविख्यात झाली. इछामती कादंबरीला लेखकाला मृत्यूनंतर रवीद्र पुरस्कार लाभला.

बिभूतिभूषण हे जातिवंत कविप्रवृत्तीचे निसर्गप्रेमी लेखक म्हणून प्रसिध्द आहेत.

निसर्गसौंदर्याची व विराटतेची नसन् नस त्यांच्या साहित्यात मोकळी झालेली दिसते. तसेच पुनर्जन्म आणि आत्म्याची अमरता या हिंदू धर्मातील गृढतत्त्वांवर त्यांचा विश्वास होता. सौंदर्यपिपासू वृत्ती व आध्यात्मिक गूढवाद यांचे सुंदर मिश्रण त्यांच्या लेखनात आढळते. व त्यामुळे लेखक अनेकदा आपल्याला आपल्या दैनंदिन सुखःदुखाच्या प्रश्नांमधून एका विलक्षण चिंतनाच्या अमर्याद प्रदेशात घेऊन जातो. दीन-दारिद्री ग्रामीण जीवनावरच प्रामुख्याने लिहिणाऱ्या बिभूतिभूषणांनी या देशातील रासवट सौंदर्य व तितकीच खोल रूजलेली गहन आध्यात्मिकता यांची सांगड घालण्यात यश मिळविले आहे.

मानवी जीवनातील आदिम प्रवृत्ती व अंतिम श्रेय यांचे इतके सखोल चिंतन बिभूतीभूषण सादर करतात, की त्यांच्या कथावस्तूला एकाच वेळी भूत-वर्तमान भविष्य या तिन्ही काळांची विशाल परिमाणे लाभून जातात आणि हे सारे इतक्या सहज सुलभ पध्दतीने व्यक्त होते, की अनेकदा लेखकाचे यामागचे कर्तृत्व व कष्ट अजिबात जाणवू नयेत.

घाटसीला येथे ते निधन पावले.

१९५०: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक बितीभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८९४)

राष्ट्रीय कीर्तन केसरी : गोविंदस्वामी आफळे हे नाव कानी येताच एक आगळा वेगळा विलक्षण माणूस नजरेसमोर येतो. व्यायामाने कमावलेले धिप्पाड शरीर, उंच-निंच आकृती, काळा-सावळा रंग, राकट उग्र पण तरीही रेखीव रुबाबदार चेहरा, शुभ्र धोतर सदरा, काळा कोट आणि काळी टोपी, कीर्तनाचे वेळी भगव्या रंगाचा ऐटबाज फेटा, शाल या साऱ्या व्यक्तिमत्त्वाला शोभेसा पहाडी खडा आवाज !

सर्वसामान्य माणसापेक्षा अनेक बाबतीत ते निराळे होते. पारंपारिक पठडीतून बाहेर पडून राष्ट्रवीरांच्या, क्रांतिकारकांच्या कथा आणि शुद्ध हिंदुत्वनिष्ठ, विज्ञानवादी दृष्टीकोन ठेऊन, आजच्या ताज्या राजकारणाशी त्याचा योग्य सांधा जोडून ते प्रखरपणे दाखवणारे, अंधश्रद्धेवर कडक टीका करणारे आणि ज्यांच्या कीर्तनाला तरुण-बाल- वृद्धांची अलोट गर्दी खेचणारे असे त्यांच्या काळातले ते एकमेव कीर्तनकार होते असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. सिनेमा, रेडीओ, टी.व्ही. अश्या विविध माध्यमांमुळे कीर्तन हा प्रकार थोडा मागे पडू लागला होता. त्यात आफळे बुवांनी नवचैतन्य निर्माण केले. क्षणात हास्याचा खळखळाट तर क्षणात वीरश्री, गहिवर दाटेल असा करूण रस तर मिश्कील कोट्या अशाप्रकारे नवरसांचा उत्कट अविष्कार त्यांच्या कीर्तनातून होत असे.
शिक्षणासाठी घर सोडून प्रथम हायस्कूलसाठी सातारा, नंतर मॅट्रीकसाठी पुणे येथे आले. पितृछत्र हरपलं होतं. धाकटी भावंडे होती. घरून मदत होण्यासारखी नव्हती तरी शिक्षणाच्या अदम्य इच्छेमुळे पडेल ते काम करून (झाड-लोट करणे, स्वयंपाक करणे, लोखंडी पत्रे कापणे, धुणी-भांडी, हमाली, मुले सांभाळणे, मंगळागौर जागवणे, चैत्रगौर मांडणे, टांगा हाकणे, म्हशी राखणे, इत्यादी), माधुकरी मागून, वार लावून, शिक्षण घेतले. त्याचवेळी कुस्तीही शिकले. पोवाडे, नाटक, मेळे यात काम करणे, उतबत्त्या विकणे कितीतरी छोटी-मोठी कामे केली. आणि १९४५ला बी.ए. ऑनर्स झाले. अभ्यासाच्या बाबतीत ते फार आग्रही होते. स्वतः M.A. L.LB. ते Ph.D. च्या प्रबंधाची तयारी करत होते.

पुण्यात हिंदुमहासभेने “केसरी” मधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर पोवाडे स्पर्धा घेतल्या. महाराष्ट्रातून शेकडो पोवाडे आले, त्यात गोविंदस्वामींच्या पोवाड्याचा प्रथम क्रमांक आला. (१९३८-३९) नंतर दादरला सावरकरांच्या घरी त्यांचे समोर त्यांचा पोवाडा विजयादशमीच्या दिवशी ऐकवावा हे भाग्य त्यांना लाभले. तसेच केसरीच्या कचेरीत सेनापती बापट यांच्या उपस्थितीत सुभाषबाबुंवरील पोवाडा सुभाषबाबुंसमोर सादर केला. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी प्रस्तावना लिहून तो प्रसिद्धही केली. गावोगाव त्यांचे कार्यक्रम गाजले आणि “शाहीर आफळे” या नावाने महाराष्ट्र त्यांना ओळखू लागला.

त्यांनी ११ चित्रपटांतून कामे केली, अनेक नाटकांतून काम केले. प्रभात चित्रपट संस्थेत “शेजारी” चित्रपटात ‘नईम’ची भूमिका त्यांना मिळाली होती पण आईने त्यांना त्या क्षेत्रातून बाहेर खेचले. हातात चिपळी दिली आणि “नभी जैसी तारांगणे तैसे लोक तुझ्या कीर्तनाला येतील” ह्या आशीर्वादासह कीर्तन करण्याची आज्ञा दिली. मातोश्रींचा आशीर्वाद फळला. बुवांच्या कीर्तनाला हजारोंनी गर्दी होई, रस्ते बंद होत. भावगीतांच्या काही रेकॉर्डसही त्यांच्या आवाजात निघाल्या. “सागरा प्राण तळमळला” हे सावरकर रचित गीत सर्वप्रथम HMV ने त्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केलेले आहे.

गांधींच्या आत्यंतिक अहिंसेच्या आग्रहामुळे हिंदुसामाजाचे आणि देशाचे कसे प्रचंड नुकसान झाले हे जाहीरपणे सांगायला ते कधी कचरले नाहीत तसेच पंडित नथुराम गोडसेंच्या स्मृतिदिनाला कीर्तन करायलाही कधी डरले नाहीत. त्यांच्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ आचार-विचारांमुळे त्यांना फार वेळा कारावास, कीर्तनांवर बंदी, जिल्हाबंदी अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले तरी त्यांची निष्ठा आणि धैर्य अभंग राहिले.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे तर त्याचं दैवतच होतं जणू! सर्वच वीर हुतात्म्यांची, क्रांतीकारकांची चरित्रे कीर्तनात अत्यंत रंगून जाऊन ते सांगत असत. संपूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरची असंख्य गावं इतकच नव्हे तर अमेरिकेतही ते ३ महिने राहून कीर्तने गाजवून आले.

अशा बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्वाचा शोध कितीही घेतला तरी तो उणाच वाटतो. गुण सांगावे तेवढे कमीच वाटतात. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!!!!

• १९८८: ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे पुणे येथे निधन. (जन्म : ११ फेब्रुवारी, १९१७ )

  • घटना :
    १६८३: छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने फोंडा येथे अद्वितीय पराक्रम करून पोर्तुगिजांचा पराभव केला.
    १७५५: भूकंप आणि सुनामीमुळे पोर्तुगालमधील लिस्बन शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर सुमारे ६०,००० ते ९०,००० लोक ठार झाले.
    १८७०: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.
    १८४५: मुंबईत आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँट मेडिकल कॉलेज या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ झाला.
    १८४८: महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.
    १८९६: नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच नग्न चित्र प्रकाशित झाले.
    १९२५: गोविंदराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रांत वऱ्हाडातील स्वराज्य पक्षाच्या तिन्ही प्रांतिक समित्यांची एक अनौपचारिक संयुक्त बैठक झाली.
    १९२८: हिंदुस्थान सरकारने आपल्याला हवे तसे बदल विधेयकात करून त्याचे कायद्यात रुपांतर केले आणि नवी महसूल संहिता वऱ्हाडात लागू करण्यात आली.
    १९४५: ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
    १९५६: भारतामध्ये भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली.
    १९५६: आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. (त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती.), दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली. तसेच केरळ राज्य अस्तित्वात आले. कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.
    पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.
    १९६८: मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिकाच्या फिल्म रेटिंग सिस्टीमची अधिकृतपणे सुरवात झाली.
    १९७३: लखदीप, मिनिकॉय, अग्निदीव बेटांचे नांव लक्षद्वीप असे ठेवण्यात आले.
    १९८२: अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली.
    १९९३: औपचारिकपणे युरोपियन युनियन स्थापन झाले.
    २०००: सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

मृत्यू :

• १८७३: बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचे निधन.
• १९९१: संगीतकार व संगीत संयोजक अरुण पौडवाल यांचे निधन.
• १९९३: ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनोदेवी यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर, १९१७ )
• १९९४: शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन.
• २००५: लेखिका योगिनी जोगळेकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट , १९२५)
• २००७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक एस. अली रझा यांचे निधन.

जन्म :
• १८८८: चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमिविषयक ग्रंथांचे लेखक पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचा जन्म.
• १८९३: शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर १९५६ – कोलकता, पश्चिम बंगाल)
• १९१८: विनोदी अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट, २००१)
• १९२६: संगीत दिग्दर्शक कवी रेडिओ वरील सुगम संगीत विभाग प्रमुख, शब्द प्रधान गायकी चे लेखक यशवंत देव यांचा पेण येथे जन्म. . (मृत्यू : ३० ऑक्टोबर, २०१८ )
• १९३२: कवी अरुण बाळकृष्ण कोलटकर यांचा कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू : २५ सप्टेंबर, २००४ )
• १९४०: भारताचे ३५वे सरन्यायाधीश रमेश चंद्र लाहोटी यांचा जन्म.
• १९४५: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट, २०१३)
• १९६३: भारतीय उद्योजीका नीता अंबानी यांचा जन्म.
• १९७३: अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा जन्म.
• १९७४: क्रिकेटपटू वांगिपुरप्पू वेंकट साई लक्ष्मण ऊर्फ व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »