अभिजित पाटील लढवणार ‘सहकार शिरोमणी’ची निवडणूक
पंढरपूर – सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्णय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी घेतला आहे.
याबाबत सोमवारी पाटील यांनी सभासद शेतकरी आणि विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक घेतली. उपस्थित ज्येष्ठ नेते मंडळींनी सहकार शिरोमणीची निवडणूक लढवण्याची मागणी पाटील यांच्याकडे केली..
शेवटी उपस्थितांना संवाद साधताना अभिजित पाटील यांनी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सर्वांना सोबत घेऊन लढवणार असल्याचे जाहीर केले. पाटील म्हणाले की, आपण विठ्ठलाच्या सभासदांची सर्व ऊस बिले अदा करूनच आपण या विचार विनिमय बैठकीला उपस्थित राहिलो आहोत. या कारखान्यावर ५०० कोटी रुपये कर्ज आहे.
याचबरोबर चालू हंगामामध्ये सभासदांची ऊस बिले, कामगारांचा पगार, मागील वर्षाची एफआरपी थकित असल्याने सभासदांमध्ये विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांच्याबाबत रोष असल्याने आपण ही निवडणूक लढवणार असून विठ्ठल बरोबर सहकार शिरोमणीच्या सभासदांना ऊसाला दर देऊ, असे आश्वासन पाटील यांनी दिले.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आपण लढवणार असून याबाबत लवकरच शेतकऱ्यांचे मत जाणून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.