पालकांच्या वाढत्या अपेक्षांची शिक्षकांनी दखल घ्यावी -इंजि. वाळू आहेर.

नाशिक : काळ बदलत चालला, तसे पालकांच्या शिक्षकांकडून असलेल्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांनी पालकांच्या या वाढत्या अपेक्षांची दखल घ्यावी, असे प्रतिपादन साखर उद्योग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ इंजि. वाळू आहेर यांनी केले.
जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय मुखेड ( तालुका येवला) येथे आयोजित शिक्षक पालक मेळाव्याचे उदघाटन प्रसंगी आहेर बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कूल कमेटी चेअरमन श्री विश्वासराव आहेर होते. मुख्याध्यापक श्री.भगत यांनी प्रास्ताविक करून विद्यालयाच्या विविध प्रकारच्या उपक्रमांची माहिती दिली. उपस्थित पालकांच्या समस्यांना श्री.बडवर यांनी समाधानकारक उत्तर दिले.
कार्यक्रमास कृष्णराव गुंड, ज्ञानदेव पाटील मांजरे, कैलासराव आहेर, रघुनाथ पानसरे, जालिंदर मोरेसह शिक्षक, पालक उपस्थित होते.
इंजि.कवी श्री वाळू आहेर यांनी भाषणात , आपल्या विद्यार्थी दशेतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी काय उपाय केले हे सांगितले. आपल्या उमेदीच्या काळात समाज हितासाठी केलेल्या कामाची उदाहरणांसह माहिती दिली.
यानिमित्ताने वाळू आहेर यांना डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ इंडिया पुणे यांचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला, त्या प्रित्यर्थ कृष्णराव गुंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री.ज्ञानदेव पाटील मांजरे, रघुनाथ पानसरे, जनार्दन आहेर आदी मान्यवरांनी श्री. वाळू आहेर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. अध्यक्षांनी नवीन चार खोल्यांचं बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. श्री.बडवर यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला.






