पर्जन्याचा सोहळा

दक्षिणोत्तर वीज जाई चमकत|
पश्चिमेकडून तुफानी वाहे वात||
झाली यंदाच्या पावसाची सुरूवात|
काळ्या मेघांनी केली गर्दी आकाशात ||१||
सोसाट्याचा वारा ऐकेना अजिबात|
टप टप थेंबं पडे जोर जोरात||
घाबरलेले पक्षी आले घरट्यात|
पुर लोटला नदी नाले तलावात ||२||
बालबालिका नाचतात पावसात|
येरे येरे पावसा म्हणती सुरात||
धुतले डोंगर पडत्या पावसात |
सचैल स्नानाने लाजे धरा मनात ||३||
इंद्रधनूचा गोफ आभाळात खुले|
बळीराजाचं स्वप्न नभात फुले ||
मोर नाचती, करिती केकारव|
पावसा बरोबर जणू गुंजारव ||४||
ओला चा-याने बैल स्फुरले शेतात|
शेतकरी लेझीम खेळती जोरात||
मशागतीचे आडाखे बांधी मनात |
विचार पक्का कृषीवलाचे डोक्यात||५||
बियाण्याचा मसला सुटला घरात|
बळीनं चौक बसवले देवळात||
जगाचा पोशिंदा निघालाय शेतात|
पावसाने केली बघा ही करामत||६||
आहेर वाळू रघुनाथ, नाशिक