‘उसासह सहा पिकांत ‘एआय’चा वापर करणार’
पुणे : राज्यात यापुढे उसासह कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मका शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्र वापरण्याचे निश्चित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘एआय’ तंत्र विस्ताराची पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवारी येथील साखर संकुलमधील ‘व्हीएसआय’च्या सभागृहात बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, या ‘एआय’ तंत्रासाठी ५०० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद यापूर्वीच केली आहे. ही तरतूद केवळ दोन वर्षांसाठी असल्यामुळे निधी कमी पडल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुरवणी मागण्यांमध्ये या निधीची तरतूद करण्याची तयारी सरकारची आहे.
‘एआय’चे महत्त्व पटवून देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, या तंत्राच्या वापराने उत्पादकता वाढतेच; पण जमिनीचे आरोग्यही सुधारते. यात अनावश्यक खतांचा वापर टाळला जातो. ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट कंपनीसह कृषी विज्ञान केंद्र व काही खासगी संस्था या क्षेत्रात उतरल्या आहेत. या तंत्राचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याबाबत राज्याच्या कृषी खात्याकडून सुरू असलेली तयारी याविषयी बैठकीत चर्चा झाली. केंद्र सरकारदेखील या तंत्राबाबत बैठक घेत असून त्याला राज्याचे कृषिमंत्री व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्याचा खरीप हंगाम जूनमध्ये सुरू होत असून त्याआधी काही निर्णय घेण्याचा प्रयत्न आहे. राज्यात एआय प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी शिखर बँकेचीही मदत घेण्याचे संकेत यावेळी पवार यांनी दिले.
दरम्यान, साखर संकुलमधील ‘व्हीएसआय’च्या सभागृहात आयोजि केलेल्या बैठकीला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंग, साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, मान्यवर बैठकीला उपस्थित होते.
शरद पवार यांच्यासमवेतची बैठक शेतकऱ्यांच्या हितासाठी
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या दालनात सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अर्ध्या तासाहून अधिक वेळ उपस्थिती होती. तोच धागा पकडून काही दिवसांत तुमच्या दोघांमधील ही तिसरी भेट असल्याचे पत्रकारांनी स्पष्ट करताच पवार म्हणाले, शरद पवार व मी विविध संस्थांच्या मंडळांवर पदाधिकारी आहोत. आम्ही तेथे जातो ते कुटुंब म्हणून नव्हे; तर चांगल्या संस्थेद्वारे लोकांच्या भल्यासाठी, कामे होण्याकरिता मी त्या संस्थांमध्ये जातो. आजची बैठक व भेटदेखील शेतकऱ्यांच्या हितासाठी होती. पंतप्रधान, मुख्यमंत्रीदेखील विविध पक्षांना, विरोधकांना बोलावून चर्चा करतात. सर्वच गोष्टींत राजकारण आणू नये.