‘आजरा’वर राष्ट्रवादीचेच वर्चस्व, मुश्रीफ यांचा दबदबा कायम

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने संचालकपदाच्या २१ पैकी १९ जागा जिंकून दणदणीत यश मिळवले. त्यांनी आमदार सतेज पाटील आणि विनय कोरे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या आधाडीचा पराभव केला. त्यांना केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

Ajara Sugar Election

या निवडणुकीमध्ये कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांसह नऊ संचालकांना पराभवाचा धक्का बसला. सभासदांनी बारा नवीन चेहऱ्यांना संधी दिली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील आदी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सुरुवातील या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोधचा प्रयत्न केला. जागा वाटपावरून समझोता न झाल्याने राष्ट्रवादीने ऐनवेळी निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती.

पण, कार्यकर्त्यांच्या दबाबामुळे राष्ट्रवादीने श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी हे स्वतंत्र पॅनेल मैदानात आणले. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. दोन्हीही आघाड्यांमध्ये विद्यमान संचालकांचा भरणा होता. सुरुवातीला ही निवडणूक चुरशीची होईल, असे वाटत होते, पण निकालात राष्ट्रवादीने चांगलीच आघाडी घेत बाजी मारली.

या निवडणुकीसाठी रविवारी (ता. १७) चुरशीने ६१ टक्के मतदान झाले होते. येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी आठला मतमोजणी सुरू झाली. संध्याकाळपर्यंत सर्व जागांचे कल स्पष्ट झाले होते.

आजरा-श्रृंगारवाडी गटात राष्ट्रवादीने अपेक्षित मतदान घेतल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साह दाटून आला. विरोधी चाळोबादेव आघाडीचे नेते व पदाधिकाऱ्यांना भादवण-गजरगाव व हात्तीवडे-मलिग्रे गटात अपेक्षित आघाडी मिळेल, अशी खात्री होती; पण तेथेही विरोधी आघाडीला अपेक्षित मतदान झाले नाही. सुळे, किणेमध्ये राष्ट्रवादीने चांगली आघाडी घेतली. निकालाचा कल राष्ट्रवादीच्या बाजूकडे झुकत असल्याने विरोधी आघाडीचे उमेदवार व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली.

या दोन्ही गटांत राष्ट्रवादीला अपेक्षित मतदान झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. मतदान केंद्राबाहेर कार्यकर्ते गुलालात न्हाऊन गेले. फटाक्यांची आतषबाजी व हलगी-घुमक्याच्या तालावर कार्यकर्ते नाचून आनंद साजरा करत होते. राष्ट्रवादीच्या विजयाच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.

निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांनी सायंकाळी पाच वाजता निकाल जाहीर केला. यामध्ये राष्ट्रवादीच्या उत्पादक गटासह इतर गटातलेही उमेदवार ४०० ते १००० मताधिक्याच्या फरकाने विजयी झाले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुजयकुमार येजरे, अमित गराडे यांनी मतमोजणी प्रक्रियेला साह्य केले.
प्रमुख पराभूत
विद्यमान अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, माजी अध्यक्ष अशोक चराटी, गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता रेडेकर, संचालक दशरथ अमृते, राजेंद्र सावंत, जनार्दन टोपले, मल्लिककुमार बुरुड.
……
रणजित देसाई, दीपक देसाई, शिवाजी नांदवडेकर, गोविंद पाटील, राजेश जोशीलकर, राजेंद्र मुरकुटे, संभाजी पाटील, संभाजी रामचंद्र पाटील, रचना होलम, मनीषा देसाई, काशिनाथ तेली या नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

स्वाभिमानी सभासदांनी कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील रवळनाथ आघाडीला भरघोस मतदान केले. त्यामुळे नूतन संचालक मंडळ पारदर्शी व सभासदाभिमुख कारभार करून कारखान्याला उर्जितावस्था मिळवून देतील. विजयामुळे पर्यायाने जिल्ह्याच्या सहकारात मंत्री मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
-के. पी. पाटील, अध्यक्ष, बिद्री कारखाना

श्री. रवळनाथ देवाने आजरा कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याची शक्ती आणि हिंमत द्यावी. स्वर्गीय वसंतराव देसाई यांनी प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत मोठ्या कष्टाने कारखाना उभारला. हे शेतकऱ्यांच्या श्रमाचे पवित्र मंदिर आहे. या भावनेचे पावित्र्य सदैव जपू. सर्व सभासद आमच्या आघाडीवर प्रचंड विश्वास व्यक्त केला. या ऐतिहासिक विजयासाठी कार्यकर्ते, हितचिंतक आणि सभासद शेतकरी अहोरात्र राबले.
-हसन मुश्रीफ, पालकमंत्री व सत्तारूढ गटाचे नेते

कारखाना कर्जमुक्त व्हावा, सभासदांचे हित जोपासले जावे, यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, असा आग्रह होता. त्यासाठी प्रयत्न केले; मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. सभासदांचा कौल मान्य आहे. यापुढेही कारखाना व सभासदांच्या हितासाठी प्रयत्नशील राहू.
-सतेज पाटील, आमदार

Ajara Sugar Elections Results

Gutentor Simple Text

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »